मंत्रीपदासाठी हाय कमांडने कॉल केला, पण या खासदाराचा मोबाईल सायलेंटवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 09:46 PM2019-06-03T21:46:33+5:302019-06-03T21:47:19+5:30
लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आपण खासदार झालो आहोत, असाही कुठे लवलेश या खासदार महोदयांच्या वागण्या-बोलण्यात जाणवत नव्हता.
नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात गरीब खासदाराने शपथ घेतली. विशेष म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी या खासदार महोदयांना दिल्लीतून फोन आला. पण, ते आपला फोन जवळील झोळीत सायलेंट मोडवर टाकून आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. दिल्लीतून हाय कमांडने फोन केल्यानंतरही त्यांना जणू काहीच घेणे-देणे नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आपण खासदार झालो आहोत, असाही कुठे लवलेश या खासदार महोदयांच्या वागण्या-बोलण्यात जाणवत नव्हता. ओडिशातील भाजपाचे नवनिर्वाचित खासदार प्रदीपचंद्र सारंगी यांना दिल्लीवरुन फोन आला होता. त्यावेळी, तुम्हाला शपथ घ्यायला यायचंय तुम्ही दिल्लीला या असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, मी कशाला यायचं? असा प्रश्न त्यांनी केला. विशेष म्हणजे हा फोन येण्यापूर्वी बराचवेळ त्यांचा फोन सायलंट असल्याने दिल्लीतील हाय कमांडचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.
निवडणूक निकालानतर NDA च्या 353 खासदारांपैकी कुणाची वर्णी मंत्रीपदासाठी लागणार याची माहिती अखेरपर्यंत उघड झालेली नव्हती. शपथविधी जाहीर झाल्यानंतरही कुणाला मंत्रिपद मिळणार हे उघड झाले नव्हते. त्यामुळे बहुतांश खासदारांची उत्कंठा वाढली होती. अनेकांना मंत्रीपदाची आशाही होती. पण, प्रदीपचंद्र सारंगी हे एकमेव खासदार यापासून लांब होते. फोन का नाही उचलला, असं दिल्लीतून विचारण्यात आल्यावरही त्यांनी शांतपणे उत्तर दिलं की, 'निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अनेकजण अभिनंदनाचा फोन करत होते. सारखा-सारखा फोन वाजत होता. त्यामुळे शेवटी मोबाईल सायलेंटवर टाकला, असे सारंगी यांनी दिल्लीतील हायकमांडला सांगितले. त्यावेळी, तुम्हाला शपथ घ्यायचीय तुम्ही दिल्लीला या असे त्यांना सांगण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांच्यासमवेत शपथविधी सोहळ्याला हजर व्हा, असा निरोप भाजपाध्यक्षांनी फोनवरुनच दिला. त्यावेळीही, मी कशाला येऊ? असं उत्तर सारंगी यांनी दिली. त्यामुळे, तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेणार आहात, असे सांगितल्यावरच त्यांना उलगडा झाला.
ओडिशाचे मोदी म्हणून प्रदीपचंद्र सारंगी यांना राज्यात ओळखले जाते. त्यांचे घर आजही गवताने शाकारलेले आणि मातीचे आहे. नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये ओडिशाचे खासदार प्रदीपचंद्र सरंगी यांचा समावेश झाला आहे. लघु-मध्यम उद्योग खाते आणि पशु-मत्स्यपालन दुग्ध व्यवसाय खात्याचे राज्यमंत्रिपद त्यांच्याकडे आहे. ओडिशाच्या किनारी भागातील सारंगी हे लोकप्रिय आणि आत्मीयतेने काम करणारे भाजप कार्यकर्ते आहेत. दोन वेळा ते आमदार म्हणूनही निवडून आले आहेत आणि आता खासदार म्हणून दिल्लीत गेले आहेत. त्यांची अत्यंत साधी राहणी, सायकलवरून फिरणे ही ओळख. त्यांचे बालासोर जिल्ह्यातील निलगिरीजवळचं गोपिनाथपूर हे गाव. तिथे ते साध्या कुडाच्या भिंती असलेल्या साध्याशा घरात राहतात.
सारंगी अविवाहित असून या घरात धाकटी बहीण बिलासिनी पांडा आणि तिचा पती मनोरंजन पांडा सारंगी यांच्यासमवेत राहतात. नानांनी म्हणजे आपल्या मोठ्या भावाने दोनदा आमदार होऊनसुद्धा राहणीमानात आणि घरात काही बदल केले नाहीत. आता केंद्रात मंत्रिपद मिळाल्यावरसुद्धा घर बदलेल असे वाटत नाही, असं त्यांची त्यांची धाकटी बहीण बिलासिनी पांडा सांगतात. केंद्रीय मंत्री म्हणू प्रदीपचंद्र सारंगी यांनी शपथ घेतल्यानंतर ओडिशाचे मोदी हे सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाले. या सर्वांत गरीब खासदाराचे घर बघायला निलगिरीजवळच्या त्यांच्या छोट्याशा घराबाहेर तीर्थक्षेत्राला असतात तशा लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. प्रतापचंद्र सारंगी भाजपच्या तिकीटावर ओडिशातील बालशोर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. बीजेडीच्या रविंद्र कुमार जेना यांना त्यांनी 12,956 मतांनी हरवले. त्यांना 2014मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, 2019मध्ये त्यांनी विजय मिळवला.
प्रतापचंद्र सारंगी यांना साधू बनायचे होते. ते त्यासाठी रामकृष्ण मठात गेले. पण, मठातील लोकांनी वडील नाहीत तर आधी आईची सेवा करण्याचा सल्ला त्यांना दिला. सारंगी हे सायकलवरून प्रवास करतात. बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी भागात त्यांनी शाळा बांधल्या आहेत. वैयक्तिक गरजा कमीत कमी ठेवल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या जवळचे म्हणून प्रतापचंद्र सारंगी यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी ओडिशाला गेल्यानंतर सारंगी यांची भेट घेतात.