टकल्या म्हणणे हा तर आहे लैंगिक छळ; इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने दिला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:23 AM2022-05-15T06:23:03+5:302022-05-15T06:24:05+5:30
हा निर्णय मनोरंजक असला तरी यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे.
डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने पुरुषाला ‘टकल्या’ म्हणणे हा लैंगिक छळ आहे, असा निर्णय दिला आहे. हा निर्णय मनोरंजक असला तरी यामुळे लैंगिक छळाची व्याप्ती वाढली आहे. टोनी फिन हे एका कंपनीत जवळपास ३४ वर्षे इलेक्ट्रिशियनची नोकरी करत होते. त्यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर, फिनने कंपनी मालकाविरुद्ध समानता कायदा, २०१० अंतर्गत तक्रार दिली. जेमी किंगने त्याला ‘टकल्या’ म्हणून संबोधून लैंगिक छळ केला होता, असा त्याने दावा केला.
कंपनीने या आरोपावर विवाद केला नाही.एम्प्लॉयमेंट जज ब्रेन यांनी मत मांडले की, “टक्कल” हा शब्द लैंगिकतेशी संबंधित आहे. न्यायाधीश ब्रेन यांच्या अध्यक्षतेखालील तीन पुरुष न्यायाधीशांच्या पॅनलने हा निकाल दिला. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या टक्कलचा संदर्भ देत टक्कल पडणे, प्रौढ पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे, हे लैंगिक वैशिष्ट्य आहे, वयाचे नाही. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा जन्मजात लैंगिक संबंध आहे. टक्कल हा मुख्यतः सर्व वयोगटातील प्रौढ पुरुषांवर परिणाम करतो, असे मत व्यक्त केले.
यापूर्वी एका प्रकरणात स्त्रीच्या स्तनांच्या आकाराबद्दल केलेली एकच टिप्पणी लैंगिक छळ असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. मालकाने आपल्या कर्मचाऱ्याला ‘टकल्या’ म्हणणे हे यासारखेच आहे, असे मत न्यायाधिकरणाने व्यक्त केले. या प्रकरणी आता नुकसान भरपाईचा रक्कम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
रोजगार न्यायाधिकरणाचे निरीक्षण
पुरुषांमध्ये आढळणाऱ्या टकलावर त्याला दुखावण्याच्या उद्देशाने टिप्पणी केली. हे अनावश्यक होते आणि अप्रतिष्ठा करणारे होते. त्या उद्देशानेच हे केले गेले होते. ते तक्रारदार कर्मचाऱ्याच्या लिंगाशी संबंधित होते म्हणून लैंगिक छळाची तक्रार योग्य आहे. सार्वजनिक हितासाठी अशा तक्रारींचा विचार करून त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. अशी चूक करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे.