कर्जमाफी मागणे ही आता फॅशन
By admin | Published: June 23, 2017 03:01 AM2017-06-23T03:01:38+5:302017-06-23T03:01:38+5:30
कर्जमाफीच्या मागणीवरून रान उठले असताना, ‘कर्जमाफी मागणे ही आजकाल एक फॅशन झालेली आहे
विशेष प्रतिनिधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जमाफीच्या मागणीवरून रान उठले असताना, ‘कर्जमाफी मागणे ही आजकाल एक फॅशन झालेली आहे,’ असे विधान करून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी वादळ निर्माण केले. विरोधी पक्षांसह शिवसेनेनेही या वक्तव्याचा निषेध केला आहे.
पुणे महापालिकेचा देशातील पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ मुंबई शेअर बाजारात झाला. त्या वेळी ते बोलत होते. नायडू असेही म्हणाले की, कर्ज घेणे आणि नंतर कर्जमाफी मागणे
ही फॅशन बनली आहे. हा पैसा शेवटी कोणाचा असतो? तो जनतेचाच पैसा असतो. कर्जमाफीच्या पर्यायाचा विचार अत्यंत विपरित परिस्थितीतच झाला पाहिजे. शिवाय कर्जमाफी हा एकमेव आणि शेवटचा पर्याय कधीही ठरू शकत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे आणि अत्यंत विपरित परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे, असे सांगून नायडू म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा जसे ग्रामीण भागात गोदामे, शीतगृहे यांची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना कमीतकमी व्याजदरावर कृषीकर्ज मिळाले पाहिजे. महाराष्ट्र सरकार या दृष्टीने भक्कम उपाययोजना करीत असल्याचे आपल्याला समाधान वाटते.