मोदींना 'BOSS' संबोधणं हा भाषणाचा हिस्सा नव्हता, एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:05 AM2023-05-25T09:05:26+5:302023-05-25T09:07:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय परदेश दौऱ्याहून भारतात परत आले.
नवी दिल्ली - प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार स्तुती केली. देशातील सर्वांत मोठ्या इनडोअर स्टेडियमपैकी एक असलेल्या कुडोस बँक एरिना येथे आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियातील हजारो भारतीयांनी जोरदार स्वागत केले. अल्बानीज यांनी मोदींची स्तुती करताच टाळ्यांचा एकच कडकडाट केला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भाषणातील स्क्रीप्टमध्ये मोदींना बॉस संबोधण्याचं लिहिलेलं नव्हतं, असे म्हणत त्या भाषणाचा किस्साच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय परदेश दौऱ्याहून भारतात परत आले. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींचे केलेलं कौतुक चर्चेचा विषय ठरला. भारताल आज जगभरातील देश ज्या नजरेतून पाहात आहेत, त्याचं कारण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींना बॉस म्हटले, त्या भाषणाचा किस्साही सांगितला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की ३ देशों की सफल यात्रा संपन्न हुई।
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 25, 2023
मेरे अनुभव के बारे में सुनिए: pic.twitter.com/5DRwFuZ8Us
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भाषणावेळी मोदींना द बॉस म्हटले, तो त्यांच्या भाषणाचा हिस्सा नव्हता, ही त्यांच्या मनातून आलेली कौतुकाची थाप होती. या कार्यक्रमानंतर स्वत: पंतप्रधान अल्बानीज यांनी जयशंकर यांच्याशी बोलताना हा किस्सा सांगितला. मोदींना बॉस म्हणणं ही माझ्या मनातील गोष्ट आहे, हा माझ्या भाषणाचा भाग नव्हता, तर माझ्या मनातील भावना होती, असे अल्बानीज यांनी म्हटले.
काय म्हणाले होते पीएम अल्बानीज
पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे त्यांचे रॉकस्टारसारखे स्वागत होते. अमेरिकन रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचा याच ठिकाणी २०१७ मध्ये कार्यक्रम झाला होता. त्यांचेही इतके भव्य स्वागत झाले नव्हते. स्प्रिंगस्टीन यांना त्यांचे फॅन बॉस म्हणून संबोधतात.
नगराला नाव ‘लिटिल इंडिया’
या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे आमगन होताच लोकांनी ‘मोदी-मोदी’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. मोदी यांनी येथील एका उपनगराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवले.