राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह अडचणीत; निवडणूक आयोगाची राष्ट्रपतींकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:31 AM2019-04-02T11:31:54+5:302019-04-02T11:35:44+5:30
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडून भाषणादरम्यान आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग नजर ठेवून आहे.
राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह आपल्या एका विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूक आयोगाने कल्याण सिंह यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. सोमवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी केलेले विधान म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे.
Rajasthan Governor Kalyan Singh in Aligarh, UP on 23rd March: We all are BJP workers and we want the BJP to emerge victorious. We want that once again Modi ji should become the PM. It is important for the country. pic.twitter.com/sJEzLqGIO2
— ANI (@ANI) March 25, 2019
दरम्यान, गेल्या आठवड्यात अलीगडमध्ये कल्याण सिंह म्हणाले होते की, 'आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहेत. भाजपाचा विजय व्हावा, असे आम्हाला वाटले. देशासाठी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत.' दरम्यान, या विधानांवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीने कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे योग्य नाही. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. मात्र, कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.