हॅलो... मोदींचा नंबर मिळेल का? 'हेल्पलाइन'वर संपर्क साधून सामान्यांची विचारणा
By देवेश फडके | Published: February 1, 2021 02:53 PM2021-02-01T14:53:55+5:302021-02-01T14:56:05+5:30
अलीकडेच लोकसभेत एका मुद्यावर चर्चा करताना सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, खासदारांपेक्षा सामान्य जनतेकडूनच या हेल्पलाइन क्रमांकावर मोठ्या प्रमाणात संपर्क साधत असल्याची बाब समोर आली आहे.
नवी दिल्ली : अलीकडेच लोकसभेत एका मुद्यावर चर्चा करताना सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, खासदारांपेक्षा सामान्य जनतेकडूनच या हेल्पलाइन क्रमांकावर मोठ्या प्रमाणात संपर्क साधत असल्याची बाब समोर आली आहे.
हेल्पलाइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. यानुसार, खासदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात दूरध्वनी येत आहेत. यापैकी अनेकांना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा नंबर हवा असतो, तर अनेक जण पंतप्रधाननरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला, सूचना द्यायचे असतात. लोकसभेतील चर्चेचे विषय किंवा त्यासंबंधित माहिती कोणी विचारत नाही, असेही कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बहुतांश दूरध्वनी ग्रामीण भागातून
हेल्पलाइनच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा वाहिनीवर हा हेल्पलाइन क्रमांक अनेकदा दाखवला गेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर दूरध्वनी येत आहेत. यातील बहुतांश दूरध्वनी ग्रामीण भागातून येत आहेत. काही जण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नंबर मागतात, तर काही जण पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागतात, अशी माहिती देण्यात आली.
कोरोनाच्या संकटात "या" देशांसाठी भारत ठरला देवदूत, लसीचे लाखो डोस केले गिफ्ट
खासदारांसाठी सुरू केली हेल्पलाइन
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाइन सुरू केली होती. याचा उद्देश सभागृहातील चर्चेवेळी खासदारांना माहिती आणि अन्य बाबी लगेच उपलब्ध होऊ शकतील, असा होता. या हेल्पलाइनचा उपयोग खासदार कधीही आणि कोणत्याही वेळेस करू शकतात, असे यावेळी सांगण्यात आले.
कोरोना लस कधी मिळणार?
लोकसभा वाहिनी ग्रामीण आणि निमशहरी भागात लोकप्रिय आहे. त्यामुळे हेल्पलाइन क्रमांक दिसल्यावर अनेकांनी कोरोना लस कधी मिळणार, असे प्रश्नही यावर संपर्क साधून विचारले. तसेच शेतकरी आंदोलनावरही अनेकांनी विचारणा केली. या हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत केवळ ४ ते ५ खासदारांनी संपर्क साधल्याची माहिती यावेळी देण्यात आली.