पोलीस ठाण्यात घुसून जमावाने पोलिसांनाच चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:28 PM2018-08-02T15:28:00+5:302018-08-02T15:30:52+5:30
चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर हा संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला.
नेल्लोर- आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यामध्ये संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांनाच मारहाण केली आहे. या सर्व प्रकाराचे कॅमेरामध्ये चित्रिकरण झाले असून आता जमावातील व्यक्ती शोधून त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चालून येत असल्याचे दिसताच पोलिसांनी ठाण्याची दारं बंद केली. तरिही त्या दारावर धडका देत जमावाने दार मोडून काढले आणि आत प्रवेश केला. हा प्रकार नेल्लोरमधील रापुरु पोलीस ठाण्यात झाला.
Andhra: A group of locals attacked Rapur police station in Nellore dist earlier tonight&thrashed police jawans after they took a local into custody in a drink&drive case. 4 cops injured,including a Sub-Inspector&a constable who received head injuries. 4 people taken into custody. pic.twitter.com/ShNfXyrkz2
— ANI (@ANI) August 1, 2018
चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर हा संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला. या गोंधळाचे व हल्ल्याच चित्रिकरण करणाऱ्या एका पोलिसाने त्यामध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यालाही मारहाण करण्यात आली.
जमावाच्या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण बाबू आणि तीन हवालदार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस उपाधीक्षक राम बाबू यांनी सांगितले. एका दारु प्यायलेल्या माणसाला आम्ही पकडले होते त्याच्यावर योग्य रितीने कारवाई करण्यासाठी आम्ही रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला व मारामारी झाली. त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि उपनिरीक्षकाला बाहेर फरपटत आणले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून तीन हवालदारांना किरकोळ जखमा झाल्या आहेत असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करु असेही त्यांनी स्पष्ट केले.