गुडगावमध्ये कॅमेरा संग्रहालय
By admin | Published: June 22, 2016 02:49 AM2016-06-22T02:49:56+5:302016-06-22T02:49:56+5:30
रघू राय, रघुबीर सिंग, कुलवंत राय, दयानिता सिंग, पाब्लो बार्थलोमेव, होमाई वायरवाला या महान व्यक्तींनी भारताचे नाव छायाचित्रण क्षेत्रात उज्ज्वल केले आहे
नवी दिल्ली : रघू राय, रघुबीर सिंग, कुलवंत राय, दयानिता सिंग, पाब्लो बार्थलोमेव, होमाई वायरवाला या महान व्यक्तींनी भारताचे नाव छायाचित्रण क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करीत आणि भारतीय छायाचित्रणाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने गुडगावमध्ये जगातील सर्वात मोठे कॅमेरा संग्रहालय उभे राहत आहे. आॅगस्ट महिन्यात जागतिक छायाचित्रणदिनी म्हणजेच १९ आॅगस्ट रोजी हे संग्रहालय खुले करण्याचा मानस आहे.
जगातील कॅमेऱ्याच्या इतिहासाला समर्पित असणारे हे संग्रहालय अर्थातच या कलाकृतींनी डोळ्यांचे पारणे फेडणारे असेल. भावी पिढीसाठी अनेक क्षण यात साठवून ठेवलेले असतील. गुडगाव महानगरपालिका आणि छायाचित्रकार आदित्य आर्य यांच्या सहकार्यातून हे संग्रहालय उभे राहणार आहे. आर्य यांच्याकडे सध्या कॅमेऱ्याचे दुर्मिळ ६०० ते ७०० मॉडेल आहेत. १९ आॅगस्टपर्यंत हे संग्रहालय सुरू करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. अर्थात, यासाठी तसा वेळ खूप कमी उरलेला आहे आणि बरेच काम अद्याप बाकी असल्याचे पालिकेचे सहआयुक्त विवेक कालिया यांनी सांगितले.
वैविध्यपूर्ण, भव्य आणि जगातील प्रमुख संग्रहालय बनविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत
आहेत. छायाचित्रणातील उत्कृष्टतेचे हे एक प्रतीक असेल, असा
विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)