अबू इस्माइलच्या शोधासाठी मोहीम

By admin | Published: July 13, 2017 12:22 AM2017-07-13T00:22:47+5:302017-07-13T00:22:47+5:30

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू इस्माइल याचा शोध घेण्यासाठी पोलीस व सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये मोठी मोहीम हाती घेतली आहे

Campaign for the search of Abu Ismail | अबू इस्माइलच्या शोधासाठी मोहीम

अबू इस्माइलच्या शोधासाठी मोहीम

Next

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार करून, जात भाविकांच्या मृत्यूस जबाबदार असलेला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू इस्माइल याचा शोध घेण्यासाठी पोलीस व सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमध्ये मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या सर्व परिचितांची चौकशी सुरू असून, सर्व संबंधितांचे फोनवरील संभाषण टॅप केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मूळ पाकिस्तानचा असलेला अबू इस्माइल अद्याप दक्षिण काश्मीरमध्येच लपून बसला असून, त्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी नाकेबंदीच लावली आहे. तो आणि त्याच्या दोन साथीदारांनी सोमवारी रात्री अमरनाथ दर्शन घेऊ न परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात सहा महिलांसह सात भाविक ठार झाले होते आणि ३२ जण जखमी झाले आहेत.
गेल्या काही काळात पोलीस व सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यात बशीर लष्करी या म्होरक्याचाही समावेश होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करण्यात आला, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. एकीकडे दहशतवादीविरोधी मोहीम आणि भारतात घुसू पाहणाऱ्या अतिरेक्यांचा केलेला खातमा यामुळेच लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दिन यांनी निष्पाप लोकांवर हल्ले सुरू केले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
>सुरक्षा व्यवस्थेविषयी समाधान
अमरनाथ यात्रेसाठी जी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, सोमवारच्या हल्ल्यानंतर रस्त्यांवरील बंदोबस्त आणखी वाढविण्यात येत आहे आणि नोंद करण्यात आलेल्या एकाही बसला अमरनाथला जाऊ दिले जाणार नाही, असे गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
ते म्हणाले की, यात्रेकरू जात असलेल्या प्रत्येक बसचीही यापुढे तपासणी केली जाईल. बस बंद पडल्यास वा पंक्चर झाल्यास ड्रायव्हरने फोनवरून त्याची माहिती सुरक्षा दल व पोलीस यांना द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अहीर व पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांचीही भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अतिरेकी हल्ल्यानंतर या दोघांना काश्मीरला जाण्याची सूचना केली होती.

Web Title: Campaign for the search of Abu Ismail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.