प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:48 AM2024-05-31T05:48:49+5:302024-05-31T05:49:39+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रदीर्घ अशा कार्यक्रमातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या ५७ मतदारसंघांत मतदान होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: १८ व्या लोकसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीसाठी ७६ दिवसांपासून देशभरात विविध सभा, रोड शोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचारतोफा अखेर गुरुवारी सायंकाळी शांत झाल्या.
शनिवारी, १ जून रोजी देशातील ८ राज्यांतील ५७ जागांसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सभा घेत प्रचाराचा धुरळा उडविला. सातव्या टप्प्यात पंजाबच्या सर्व १३ जागांसह हिमाचल प्रदेश ४, उत्तर प्रदेश १३, बंगाल ९, बिहार ८, ओडिशा ६, झारखंड ३ व चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे.
प्रचार संपताच माेदी ध्यानासाठी कन्याकुमारीत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच गुरुवारी सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ते ४५ तास ध्यानधारणा ते करणार आहे.
- कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम भगवती अम्मन मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर बोटीने रॉक मेमोरियलमध्ये येत ध्यान सुरू केले. १ जूनपर्यंत ते ध्यानस्थ राहणार आहेत.
शेवटचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी!
संविधान वाचविण्याची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसने मात्र आणीबाणीवेळी लोकशाहीची हत्या केली होती. अग्निवीर योजनेला विरोध करणारे लष्कराला राजकीय हत्यार करू पाहत आहेत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गेल्या १५ दिवसांत माेदींनी सभेत २३२ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, ७५८ वेळा स्वत:चे, ‘इंडिया’ आघाडीचे आणि विरोधकांचे ५७३ वेळा नाव घेतले, मात्र बेरोजगारीबद्दल शब्दही काढला नाही.
- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत द्वेषपूर्ण विधाने केली. त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रचारासह पंतप्रधानपदाची प्रतिष्ठाही धुळीस मिळविली. संविधान वाचविण्याचे काम कॉंग्रेसच करू शकते.
- डॉ. मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान
कोणाच्या किती प्रचारसभा व रोड शो?
- नरेंद्र मोदी - २०६
- राहुल गांधी - ७६
- प्रियांका गांधी - ३८
- अखिलेश यादव - ५४
- मल्लिकार्जुन खरगे - ३१
- मायावती - २१