Shame...दिव्यांगांच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्याची 'पाय तोडण्याची' धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:19 AM2018-09-19T10:19:13+5:302018-09-19T11:12:26+5:30
दिव्यांगांच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहिलेल्या या केंद्रीय मंत्र्यानं एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याचीच धमकी दिली.
नवी दिल्ली - भाजपाचे नेते, मंत्री बेलात तसंच वादग्रस्त विधाने करुन वाद अंगावर ओढवून घेत असल्याची मालिकाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं चित्र आहे. या यादीत आता केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांसाठीच्या कार्यक्रमादरम्यान बाबुल सुप्रियो यांनी एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याचीच धमकी दिली. हे वादग्रस्त विधान करुन सुप्रियो यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.
दिव्यांगांना व्हीलचेअर तसंच अन्य साहित्य वाटप करण्यासाठी आसनसोल येथे एका शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमधील एक व्यक्ती सतत हालचाल करत होता. त्याच्या सततच्या हालचाली करण्यावर नाराजी व्यक्त करत बाबुल सुप्रियो यांनी भर कार्यक्रमात त्याला चक्क 'पाय तोडण्याची' धमकी दिली.
'तुम्हाला काही अडचण आहे का?, तुम्हाला काही झालंय का?... मी तुमचे पाय तोडून तुमच्या हातात कुबड्या देऊ शकतो', अशी धमकी रागाच्या भरात बाबुल सुप्रियो यांनी त्या व्यक्तीला दिली. पुढे त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकालाही अशी सूचना दिली की, 'जर या व्यक्तीनं पुन्हा हालचाल केली तर पाय तोडून त्याच्या हातात कुबड्या द्या'.
दरम्यान, बेताल आणि वादग्रस्त विधाने करण्याची बाबुल सुप्रियो यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही अनेकदा आक्षेपार्ह विधाने केल्यानं ते चर्चेत राहिले आहेत.
What happened to you? Any problem? I can break one of your legs: Union Minister Babul Supriyo to a man during a program for differently abled people at Nazrul Manch in Asansol #WestBengalpic.twitter.com/cFxpF7K6Pn
— ANI (@ANI) September 18, 2018
(शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर)
दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही 14 सप्टेंबरला वादग्रस्त विधान केले होते. शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे वादग्रस्त विधान प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात केले होते. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकादेखील झाली होती.