लंगूर माकडाचा आवाज काढता येतो? मग इथे नोकरी नक्की मिळेल.,,
By Admin | Published: May 14, 2016 12:17 PM2016-05-14T12:17:24+5:302016-05-14T12:21:26+5:30
माकडांचा त्रास कमी व्हावा, त्यांना हुसकावून लावण्यासाठी उत्तर प्रदेशमधील बरेली शहरातील महापालिका अधिका-यांनी 'लंगूर मॅन'चा शोध सुरू केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. १४ - माकडांचा त्रास कमी व्हावा, त्यांना हुसकावून लावण्यासाठी उत्तर प्रदेशमधील बरेली शहरातील महापालिकेने आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत, मात्र तरीही माकडांचा उपद्व्याप कमी न झाल्याने महापालिकेने आता नवी शक्कल लढवली आहे. माकडांना हुसकावण्यासाठी त्यांनी 'लंगूर मॅन'चा शोध सुरू केला आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे..
खरतर आजकालची माकडं ही मनुष्याला जास्त घाबरत नाहीत पण आपल्याच जातीतील लंगूरांना (माकडाचा एक प्रकार) पाहून वा त्यांचा आवाज ऐकून ते धूम ठोकतात. त्यामुळे आता पालिका अधिकारी अशा व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याला लंगूरसारखा आवाज काढता येईल. याआधीही हा प्रयोग यशस्वी ठरला होता आणि माकडे पळून गेली होती. त्यामुळे आता बरेली शहरात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
महापालिका अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एनजीओच्या मदतीने आगरा, एटा व कासगंज येथे लंगूरचा आवाज काढणा-या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचा आवाज ऐकूनच उपद्रव देणारी माकडं पळून जातात. त्यामुळे यावेळी महापालिकेने ज्या ठेकेदाराला माकडं पकडण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, त्यात हे 'लंगूर मॅन'ही सहभागी होणार आहेत. ज्या निवासी परिसरात माकडांचा सर्वाधिर उपद्रव होतो, ही लोकं तेथे जाऊन त्या माकडांना शहराच्या बाहेर पळवून लावतील. व त्यानंतर तेथे उपस्थित असलेली टीम या माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडून येईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली.