‘भारतरत्न’चे वर्तन तपासू शकत नाही!

By admin | Published: July 19, 2016 05:49 AM2016-07-19T05:49:51+5:302016-07-19T05:49:51+5:30

‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे किंवा कसे वागू नये

Can not check Bharat Ratna's behavior! | ‘भारतरत्न’चे वर्तन तपासू शकत नाही!

‘भारतरत्न’चे वर्तन तपासू शकत नाही!

Next


नवी दिल्ली : ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे किंवा कसे वागू नये, याविषयी कोणताही कायदा किंवा नियम नसल्याने अशा व्यक्तीचे एखादे वर्तन योग्य आहे की, अयोग्य हे आम्ही ठरवू शकत नाही, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याच्याविरुद्धची एक याचिका सोमवारी फेटाळून लावली.
सन २०१२ मध्ये भारत सरकारने सचिनला ‘भारतरत्न’ दिले. मात्र, सचिन या सर्वोच्च नागरी बहुमानाचा दुरुपयोग करीत असल्याने त्याचा हा किताब परत घेतला जावा, अशी जनहित याचिका भोपाळ येथील व्ही. के. नासवा यांनी जबलपूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेल्या वर्षी केली होती. नावामागे ‘भारतरत्न’ असे लावण्यास मनाई असूनही ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ अशा शीर्षकाची सचिनवरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शिवाय, सचिन या बहुमानाचा व्यावसायिक दुरुपयोग करीत आहे, असा नासवा यांचा दुहेरी आक्षेप होता.
स्वत:च युक्तिवाद करणाऱ्या नासवा यांनी जाडजूड याचिका दाखल केली होती, परंतु ‘भारतरत्न’ व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कसे वागावे, या विषयीचे कोणतेही नियम अथवा कायद्यातील तरतूद त्यात नव्हती. तशी काही तरतूद असेल, तर याचिकेत सुधारणा करून ती सादर करण्याची न्यायालयाने त्यांना संधी दिली. तरी ते असा कोणताही दस्तावेज सादर करू शकले नव्हते. या पार्श्वभूमीने उच्च न्यायालयाच्या न्या. राजेंद्र कुमार मेनन व न्या.सुशीलकुमार गुप्ता यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी १० आॅगस्ट रोजी ही याचिका फेटाळली होती.
याविरुद्ध नासवा यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (अपील) केली व तेथेही स्वत:च युक्तिवाद केला.
सोमवारी हे अपील फेटाळताना न्या. दीपक मिश्रा व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘भारतरत्न’ मिळालेल्या सचिन तेंडुलकरचे सार्वजनिक जीवनातील वर्तन या बहुमानाला साजेसे नाही, असा अर्जदारांचा आक्षेप आहे, परंतु याविषयी कोणताही कायदा अथवा नियम नसल्याने तेंडुलकरचे हे कथित वर्तन योग्य आहे की, अयोग्य याची शहानिशा आम्ही करू शकत
नाही. (विशेष प्रतिनिधी)
>...तर जबाबदार नाही
न्यायालयाने म्हटले की, सचिन तेंडुलकरने स्वत: पुस्तक लिहून आपल्या नावामागे ‘भारतरत्न’ अशी बिरुदावली लावली असती, तर गोष्ट वेगळी होती. तिसऱ्या कोणीतरी लिहिलेल्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘भारतरत्न’ असा शब्दप्रयोग केला गेला असेल, तर त्यासाठी सचिनला मुळीच जबाबदार धरता येणार नाही.

Web Title: Can not check Bharat Ratna's behavior!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.