हिंदू धर्माचा अर्थ साधूसंतही सांगू शकणार नाहीत- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:56 AM2018-12-04T04:56:42+5:302018-12-04T04:56:58+5:30
पंतप्रधान मोदी यांना हिंदू धर्म समजला नाहीत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जाहीर सभांतून सांगू लागले आहेत.
जयपूर : पंतप्रधान मोदी यांना हिंदू धर्म समजला नाहीत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जाहीर सभांतून सांगू लागले आहेत. पण हा धर्म इतका विशाल आहे आणि त्यात इतक्या विचारधारा आहेत की, त्याचा नेमका अर्थ सांगणे साधू-संतांनाही आतापर्यंत जमलेले नाही. बहुधा एकट्या गांधी यांनाच धर्म समजला असावा. अर्थात आम्हाला, भाजपाला केवळ एकच धर्म माहीत आहे आणि तो आहे विकासाचा धर्म. राज्याचा, देशाचा विकास हाच आमचा धर्म आहे, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले.
राजस्थान व तेलंगणा या दोनच राज्यांमध्ये आता मतदान शिल्लक असून, भाजपाने आपली सारी ताकद राजस्थानात लावण्याचे ठरविले आहे. तिथे भाजपाची स्थिती चांगली नसल्याचे बोलण्यात येत असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा हे येत्या चार दिवसांत तिथे आणखी सभा घेण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही आज राजस्थानात सभा घेतल्या. आपला पुनर्जन्म महाराणा प्रताप यांच्या राजस्थानातच व्हावा, असे अमित शहा म्हणाले. या सभेत त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणेही शक्य झाले नसल्याने तो पक्ष जिंकूच शकणार नाही, असा दावा केला.
>व्हील मोदींकडेच
राजस्थानातील सर्वच भाजपा नेत्यांची भिस्त आता केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. आपल्याला मोदीच विधानसभाजिंकून देतील, असे त्यांना वाटत आहे.
त्यामुळे राजस्थानच्या खडकाळ रस्त्यावर भाजपाच्या वाहनाचे व्हील त्यांनी जणू मोदी यांच्या हातीच दिले आहे.