माझं नाव स्मृती इराणी, जात सांगू शकता?
By admin | Published: February 25, 2016 02:19 AM2016-02-25T02:19:50+5:302016-02-25T05:11:13+5:30
लोकसभेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी केलेल्या आरोपाला आणि टीकेला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - माझं नाव स्मृती इराणी, जात सांगू शकता का, असा सवाल करत लोकसभेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी केलेल्या आरोपाला आणि टीकेला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. यावेळी त्या म्हणाल्या, माझं नाव स्मृती इराणी, जात सांगू शकता का? शिक्षणक्षेत्राची युद्धभूमी बनवू नका, अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते. मृत रोहित वेमुलाचे राजकीय शस्त्र बनवून केंद्र सरकारवर हल्ला करणे योग्य नाही. मी कोणत्याही विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप केलेला नाही. तरीही एकाही कुलगुरूने हस्तक्षेपाची तक्रार केल्यास राजीनामा देईन, अशा शब्दांत स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या भाषणातील काही मुद्दे :
- मृत रोहित वेमुलाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जातो. त्याच्या मृत्यूवरुन राहुल गांधींनी राजकीय संधी पाहिली. तेलंगणा चळवळीत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा बळी गेला. त्यावेळी राहूल गांधी एकदा तरी गेले होते का? नाही ! यामध्ये कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीय संधी पाहीली.
- माझ्यावर आरोप करण्यात येतो की, मी विद्यापीठाच्या प्रशासनाला पत्र लिहीते. ज्या खासदारांच्या मुलांना अॅडमिशन घ्यायचे आहे, ते माझ्याकडे येतात. माझे ते काम असून त्याबद्दल मी माफी मागणार नाही. मंत्री झाल्यापासून गेल्या २० महिन्यात, मी कोणतीही मनात गाठ न ठेवता फक्त देशाची आणि लोकांची सेवा केली आहे. टीएमसीचे खासदार सौगता रॉय आणि शशी थरुर यांच्यासुद्धा पत्राला माझ्या मंत्रालयाने प्रतिसाद दिला आहे. तसेच, एआयएमआयएमचे प्रमुख ओवैसी यांच्या सुद्धा पत्राला उत्तर दिले आहे.
- एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्याची राजकीय लढाई झाली. रोहित वेमुला प्रकरणी कार्यकारिणी समितीने निर्णय घेतल्याचे देशाला माहित आहे. या समितीमध्ये कोणताही सदस्य एनडीएने नियुक्त केला नाही, तर सर्वांची नियुक्ती युपीएने केली होती.
- रोहित वेमुला राजकीय फायद्यांचा वापर करत होता. याचे मी पुरावे देते. मला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी लगेचच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या मदतीसाठी फोन केला. त्यावेळी मला सांगण्यात आले की, साहेब कामात व्यस्त आहेत. माझ्याकडे फोनचे रेकॉर्ड आहे.
- रोहित वेमुलाजवळ कोणीही डॉक्टरला जाण्यास परवानगी दिली नाही. अगदी एकानेही त्याला पुन्हा जगू देण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करण्यात आला. तेलंगणा पोलीस काय म्हणत आहेत.
- माझ्या म्हणण्याला प्रतिसाद न देता विरोधकांना फक्त राजकारणात रस असल्याचे म्हणत स्मृती इराणी यांनी सभागृहात चर्चेच्यावेळी गैरहजर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला.
- तुमच्या देशभक्तीचा मी दाखला देऊ शकत नाही. पण खालच्या पातळीला जाऊ नका.
- कन्हय्या, उमर खालिद आणि अन्य काही विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्याची शिफारस जेएनयू प्रशासनानेच केली होती.
- उमर खालिदने विद्यापीठ प्रशासनाची दिशाभूल केली होती. कविता संमेलनाच्या कार्यक्रमासाठी त्याने प्रशासनाची परवानगी मागितली होती.