ट्रुडोंना मोदींनी चांगलाच धडा शिकविला? तीन दिवसांपासून भारतात, तिकडे कॅनडातून अपमानावर टीका...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:11 PM2023-09-12T14:11:20+5:302023-09-12T15:22:25+5:30
रविवारी कॅनडाचे मोठे वृत्तपत्र टोरंटो सनने धिस वे आऊट या शीर्षकाखाली पहिल्याच पानावर एक फोटो छापला आहे.
विमानात बिघाड झाल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे गेल्या तीन दिवसांपासून भारतात अडकले आहेत. आज त्यांचे विमान दुरुस्त झाल्याने ते आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ कॅनडाला निघणार आहेत. परंतू, या जी २० परिषदेमुळे कॅनडात मात्र मोठे वादळ आले आहे. ट्रुडो यांना जी २० परिषेदेदरम्यान भारतात मिळालेल्या वागणुकीवरून प्रसरमाध्यमांसह विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे.
खलिस्तानी मुद्द्यावरून भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यातूनच कॅनडाच्या पंतप्रधानांना अशी वागणूक मिळल्याचा सूर परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. रविवारी कॅनडाचे मोठे वृत्तपत्र टोरंटो सनने धिस वे आऊट या शीर्षकाखाली पहिल्याच पानावर एक फोटो छापला आहे. राजघाटावर मोदींनी पारंपरिक पद्धतीने हस्तांदोलन केल्यावर दुसऱ्या हाताने मोदींनी ट्रुडोंना इशारा केला, तोच हा फोटो आहे. याचवेळी ट्रुडो यांना भारतातील जी २० मध्ये त्यांचे मित्र खूप कमी आहेत, याचा भास झाला असेल, असे या वृत्तपत्रात म्हटले आहे.
द सन वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार जी20 परिषदेच्या आदल्या रात्री भारताने आयोजित केलेल्या डिनरला ट्रुडो उपस्थित नव्हते. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने असे का घडले याचे स्पष्टीकरण दिले नाहीय. स्वच्छ, हरित उर्जा आणण्याच्या प्रगतीसाठी भागीदारी असलेल्या ग्लोबल बायोफ्यूअल्स अलायन्सच्या लॉन्चला ट्रूडो देखील उपस्थित राहिले नाहीत.
कॅनडातील विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी हे अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांना उर्वरित जगाकडून वारंवार अपमानित केलेले कोणालाही पहावणारे नाही, असे ते म्हणाले. ट्रूडो यांनी विनंती करूनही भारताकडून द्विपक्षीय बैठक घेण्याची परवानगी मिळाली नाही, मात्र फक्त मोदींसोबत चर्चा करण्याची संधी दिली गेली. रॉयटर्स आणि ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार या चर्चेदरम्यान मोदींकडून त्यांना टीकात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचा दावा करण्यात आला होता.
कॅनडाचे पंतप्रधान भारतात आल्यानंतर इतर नेत्यांप्रमाणे मोदींनी 'स्वागत नोट' पोस्ट केली नाही. मोदी यांनी ट्रुडो यांच्यासोबत झालेल्या भेटीत कठोर भूमिका घेतली आणि कॅनडात भारतविरोधी कारवाया सुरू राहणे ही 'तीव्र चिंतेची' बाब असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तर ट्रुडो यांनी कॅनडाच्या कारभारात भारताचा हस्तक्षेप हा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले. कॅनडाने वारंवार खलिस्तानी दहशतवाद्यांना भारत विरोधी आंदोलनांसाठी त्यांची भूमी वापरू देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भारताने खलिस्तानींविरोधात आक्रमक निती अवलंबलेली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. यातूनच ट्रुडो यांना जी २० परिषदेत मोदींकडून महत्व दिले गेले नसल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.