शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पंतप्रधान ट्रुडोनी कोरोना लशीसाठी केला फोन, मोदींनी दिलं असं उत्तर
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 11, 2021 01:38 PM2021-02-11T13:38:47+5:302021-02-11T13:40:24+5:30
पंतप्रधान ट्रुडो यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. ट्रुडो म्हणाले होते, 'कॅनडा जगात कुठेही शांततामय आंदोलनाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी उभा राहील.' यावर भारताने आपली प्रतिक्रिया दिली होती. (Canada PM Justin Trudeau)
नवी दिल्ली :कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (justin trudeau) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बुधवारी कोरोना लशीसाठी (covid 19 vaccine) फोन केला होता. यासंदर्भात खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच एका ट्विटद्वारे माहिती दिली. यात, ‘माझे मित्र जस्टिन ट्रुडो यांचा फोन आल्याने मला आनंद झाला. कॅनडाने जेवढ्या कोरोना डोसची मागणी केली आहे, तेवढे डोस त्यांना पुरविण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करेल, असे आश्वासन मी त्यांना दिले आहे. याच बरोबर आम्ही, हवामान बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरी सारख्या अनेक मुद्यांवर चर्चा केली,' असे मोदींनी सांगिले. भारत अनेक मित्र देशांना कोरोना लस पुरवत आहे. (Canada PM Justin Trudeau asks for Corona vaccine to PM Narendra Modi)
मोदींचं ट्रूडोंना आश्वासन -
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, मोदींनी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना आश्वासन दिले आहे की कॅनडाच्या लसीकरण कार्यक्रमात भारत पूर्णपणे मदत करेल. आपल्या देशाला कोरोना लशीची आवश्यकता असल्याचे कॅनाडाच्या पंतप्रधानांनी मोदींना फोनवर बोलतांना सांगितले. यावर, ‘भारताने ज्या पद्धतीने इतर देशांना मदत केली, अगदी त्याच प्रकारे भारत कॅनडाच्या लसीकरण कार्यक्रमातही मदत करेल,’ असे मोदींनी म्हटले आहे. दोन्ही नेते या वर्षाच्या अखेरीस अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भेटणार आहेत.
Was happy to receive a call from my friend @JustinTrudeau. Assured him that India would do its best to facilitate supplies of COVID vaccines sought by Canada. We also agreed to continue collaborating on other important issues like Climate Change and the global economic recovery.
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2021
ट्रूटो यांच्याकडून भारताची तारीफ -
जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, यावेळी ट्रुडो म्हणाले, कोरोना विरोधातील लढाईत भारताकडे असलेल्या अभूतपूर्व औषधी क्षमतेचे महत्वाचे योगदान असेल. या क्षमतेचा जगासाठी उपयोग केल्याबद्दल त्यांनी मोदीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर असलेली भागिदारी सुरू ठेवण्यावरही सहमती झाली.
ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाला दिला होता पाठींबा -
पंतप्रधान ट्रुडो यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. ट्रुडो म्हणाले होते, 'कॅनडा जगात कुठेही शांततामय आंदोलनाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी उभा राहील.' यावर भारताने आपली प्रतिक्रिया देत म्हटले होते, 'भारतातील शेतकऱ्यांसंदर्भात कॅनडातील नेत्यांच्या काही भ्रामक सूचनांच्या आधारे देण्यात आलेल्या प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे योग्य नाही. विशेषतः जेव्हा त्या प्रतिक्रिया एखाद्या लोकशाही असलेल्या देशाच्या अंतर्गत समस्यांशी संबंधित असतील.'