वयाचा खोटा दाखला देणाऱ्या 'या' नेत्याची आमदारकी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:31 AM2020-02-28T10:31:45+5:302020-02-28T10:33:06+5:30
खोटा जन्माचा दाखला बनविल्याच्या आरोपाखोली आजम खान यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा सीतापूर कारागृहात अटक आहेत.
नवी दिल्ली - रामपूरचे खासदार आजम खान यांचे चिरंजीव आणि स्वार मतदार संघाचे समाजवादी पक्षाचे आमदार मोहम्मद अब्दुल्ला आजम खां यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान, त्यांची पत्नी तंजीन फात्मा आणि मुलगा मोहम्मद अब्दुल्ला आजम खां हे तिघे कारागृहात बंद आहेत. विधानसभा सचिव प्रदीप कुमार दुबे यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं की, नवाब काजिम अली खां यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर इलाबाद उच्च न्यायालयाने मो. अब्दुल्ला आजम खान यांचे विधासभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावर अंमलबजावणी करण्यास स्थगिती देण्याचा निर्णय अद्याप आलेला नसल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे मो. अब्दुल्ला आजम खान यांचे विधानसभेतील सदस्यत्व 16 डिसेंबर 2019 पासून रद्द झाले आहे. अब्दुल्ला यांच्याविरुद्ध ही याचिका बहुजन समाज पक्षाचे नेते काजिम अली खान यांनी दाखल केली होती. अब्दुल्लाचे वडिल अर्थात आजम खान रामपूर लोकसभा मतदार संघातून खासदार असून याच लोकसभा मतदार संघात अब्दुल्ला यांचा स्वार विधानसभा मतदार संघ आहे. तर अब्दुल्लाची आई तंजीन फात्मा रामपूर विधानसभा मतदार संघातून आमदार आहेत. खोटा जन्माचा दाखला बनविल्याच्या आरोपाखोली आजम खान यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा सीतापूर कारागृहात अटक आहेत.