परिवहनच्या तिकीट सवलती रद्द होणार ठेकेदाराचा इशारा : भाईंदर पालिकेकडून प्रतिपूर्ती नाही
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:52+5:302015-02-14T23:51:52+5:30
राजू काळे
Next
र जू काळेभाईंदर : पालिकेच्या पीपीपी (पब्लिक ॲण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावरील परिवहन सेवेकडून तिकीटदरात समाजातील विविध घटकांना देण्यात येणार्या सवलती १५ फेब्रुवारीपासून रद्द करण्यात येणार आहेत, असे परिवहन ठेकेदार कंपनीने स्पष्ट केले. या सवलतींची प्रतिपूर्ती (मूळ तिकीटदरातील तफावत) ठरल्याप्रमाणे पालिकेकडून करण्यात येत नसल्याचे कारण यामागे देण्यात येत आहे.परिवहन सेवेचा ठेका पालिकेने उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला दिला आहे. मात्र, करारानुसार पालिकेने ठेकेदाराला बस आगारासाठी जागा न दिल्याने बस रस्त्यावरच पार्क केल्या जात आहेत. त्यांची दुरुस्तीही एकमेव उड्डाणपुलाखाली केली जात आहे. अत्यावश्यक जागेअभावी बसच्या दुरुस्तीसह पार्किंगही ठेकेदारासाठी डोकेदुखी ठरत आहे. असे असतानाच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईतही अपेक्षित तिकीट दरवाढ पालिकेकडून करण्यात येत नाही. त्यामुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचार्यांना नियमित पगार मिळत नसल्यामुळे आणि बसची वेळीच दुरुस्ती होत नसल्यामुळे ही सेवा औटघटकेची ठरण्याची चिन्हे आहेत. असे असतानाही पालिकेने मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर व राजकीय मागणीनुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात सवलती देण्याचे निर्देश ठेकेदाराला दिल्यानंतर त्या सवलती लागू केल्या. त्या वेळी सवलतींच्या तफावतीची रक्कम पालिकेकडून भरली जाईल, असे ठरविण्यात आल्याचे ठेकेदार कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परंतु, ही तफावत भरण्यात आलेली नाही. त्यामुळे चार वर्षांत सुमारे ३ कोटींची रक्कम थकीत राहिल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. यामुळे या सवलतीच रद्द करण्याचा पवित्रा ठेकेदाराने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सवलतींच्या मासिक पासातील तफावतीचा दर भरूनच लाभार्थी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) (फोटो - १४भाईंदर बस/नोटीस फलक)