कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना धक्का! सरकारच्या नियंत्रणात असलेली औषधे महागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 08:18 IST2025-03-27T07:55:40+5:302025-03-27T08:18:14+5:30
देशात कर्करोग, मधुमेह, हृदयाशी संबंधित औषधे आणि प्रतिजैविकांच्या किमती लवकरच वाढू शकतात.

कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना धक्का! सरकारच्या नियंत्रणात असलेली औषधे महागण्याची शक्यता
Medicine Price Increased: जर तुमच्या घरात मधुमेह, कर्करोगाचे रुग्ण असल्यास त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. या श्रेणीतील औषधांच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने औषधांच्या किमतीत केलेल्या वाढीचा परिणाम दोन ते तीन महिन्यांनंतर दिसून येईल. तीन महिन्यांचा साठा आधीच असल्याने सुरुवातीला रुग्णांना याचा फटका बसणार नाही.
महागाईचा मोठा फटका आरोग्य क्षेत्राला बसणार आहे. सरकार कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि एंटीबायोटिक यांसारख्या आवश्यक औषधांच्या किमती वाढवली जाण्याची शक्यता आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांच्या किमती १.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्सचे सरचिटणीस राजीव सिंघल यांनी औषधांच्या किमती वाढल्याने औषध उद्योगाला दिलासा मिळू शकणार आहे, फार्मा उद्योगात कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्च वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संसदेच्या रसायने आणि खतांवरील स्थायी समितीने केलेल्या अभ्यासात आढळून आलं होतं की औषध कंपन्या वारंवार औषधांच्या किमती मर्यादेपेक्षा जास्त वाढवून नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटीने ३०७ करणांमध्ये फार्मा कंपन्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले होते.
दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३६ जीवनरक्षक औषधांवरून कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केली होती. "कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी सरकारने ३६ जीवनरक्षक औषधांवर मूलभूत कस्टम ड्यूटी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे," असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं होतं.