7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्टम ड्यूटी रद्द केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 07:32 PM2023-03-30T19:32:15+5:302023-03-30T20:51:30+5:30
केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे.
नवी दिल्ली:केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या विशेष वैद्यकीय औषधे आणि खाद्यपदार्थांवर ही सूट उपलब्ध असेल. 1 एप्रिल 2023 पासून आयात शुल्क सूट लागू होईल. सरकारने विविध प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमाबलाही सीमा शुल्कातून सूट दिली आहे. औषधांवर साधारणपणे 10 टक्के सीमा शुल्क आकारले जाते, तर जीवनरक्षक औषधांच्या काही श्रेणींवर 5 टक्के सीमा शुल्क आकारले जाते.
Customs Duty Exemption for all imported drugs and food for Special Medical Purposes for Personal Use for Treatment of all Rare Diseases.
— CBIC (@cbic_india) March 30, 2023
Basic Customs Duty also fully exempted on Pembrolizumab (Keytruda) used in treatment of various cancers.
Notfn 👉 https://t.co/Lo9H945Dj2pic.twitter.com/g292H4xU3J
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून दुर्मिळ कर्करोगाने पीडित मुलीच्या उपचारात वापरल्या जाणार्या आयात औषधावर सीमाशुल्कातून सूट देण्याचे आवाहन केले होते. निहारिका नावाच्या या मुलीच्या उपचारासाठी 65 लाख रुपयांच्या इंजेक्शनची गरज होती. त्यावर सुमारे 7 लाख रुपये कर आकारला जात होता. मुलीचे पालक हा कर भरण्यास असमर्थ ठरल्याने त्यांनी थरुर यांना आपली समस्या सांगितली. आता सरकारने सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधांवरील आयात शुल्क रद्द करुन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या पावलामुळे निहारिकाच्या कर्करोगावरील उपचारासाठीचे इंजेक्शनही 7 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.
आजार सूचीबद्ध असावा
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्याने काही दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे वैयक्तिकरित्या आयात केली तर त्याला सीमा शुल्क भरावे लागणार नाही. हा रोग दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध असायला हवा.
प्रमाणपत्र द्यावे लागेल
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्र किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये हा आजार दुर्मिळ आजारांतर्गत येत असल्याचे प्रमाणित करावे लागेल. विशेष म्हणजे, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांना सीमाशुल्क सूट आधीच देण्यात आली आहे.