गावठी तांदळाच्या वाणांत कर्करोग प्रतिकारक गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:09 AM2018-02-19T02:09:45+5:302018-02-19T03:16:18+5:30
छत्तीसगढमध्ये पारंपरिक शेतीत पेरल्या जाणा-या ‘गठवान’, ‘महाराजी’ आणि ‘लाईचा’ या तीन गावठी वाणाच्या तांदळात कर्करोग प्रतिकारक गुणधर्म असल्याचे संशोधनातून दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
रायपूर : छत्तीसगढमध्ये पारंपरिक शेतीत पेरल्या जाणा-या ‘गठवान’, ‘महाराजी’ आणि ‘लाईचा’ या तीन गावठी वाणाच्या तांदळात कर्करोग प्रतिकारक गुणधर्म असल्याचे संशोधनातून दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) वैज्ञानिकांनी या तांदळाच्या वाणांवर संशोधन केले. कृषी विद्यापीठाच्या जनुकिय बँकेत जतन करून ठेवलेल्या धान्याच्या पारंपरिक बियाण्यांमधून हे तीन वाण संशोेधनासाठी घेण्यात आले.
या संशोधन चमूचे प्रमुख डॉ. दीपक शर्मा यांनी ही माहिती देताना सांगितले की, शरीरातील अन्य पेशींना अपाय वन करता फुफ्फुस आणि वक्षाच्या कर्करोगात फक्त कर्कग्रस्त पेशींना बरे करण्याचे गुणधर्म या तीन जातीच्या तांदळात असल्याचे आढळले. खासकरून ‘लाईचा’ जातीचा तांदू ळ कर्कग्रस्त पेशींचा प्रसार रोखण्यात आणि त्यांचा नाश करण्यात अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले.
डॉ. शर्मा म्हणाले की, या तांदळाच्या जातींमधील काही औषधी गुणधर्मांमुळे कर्कग्रस्त पेशींचा
प्रसार रोखला जातो एवढेच नव्हे तर त्या बव्हंशी नष्ट करण्यासही मदत होते.
छत्तीसगडमध्ये पारंपरिक शेतीमध्ये वापरले जाणारे तांदळाचे अनेक वाण थोर संशोधक आर. एच. रिछारिया यांच्या प्रयत्नांतून जतन करून ठेवले गेले आहेत. त्यातील तीन वाणांवर केले गेलेले हे संशोधन लक्षणीय आहे. लवकरच या तांदळाच्या वाणांचा कर्करोगावरील उपचारासाठी उपयोग करणे शक्य होईल.
- डॉ. एस. के. पाटील, कुलगुरु, इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय.
डॉ. शर्मा म्हणाले की, छत्तीसगडच्या अनेक भागांत आणि विशेष करून बस्तर या आदिवासी भागात ‘गठवान’, ‘महाराजी’ आणि लाईचा’ या वाणाच्या तांदळाचा पारंपरिक औषधी म्हणून वापर करण्याची पूर्वापार प्रथा आहे. ‘गठवान’ हा तांदूळ संधीवातावर गुणकारी आहे, तर आदिवासी लोक ‘लाईचा’ तांदळाचा काही त्वचा रोगांवरील उपचारांसाठीही उपयोग करतात. गेल्या वर्षी इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय व ‘बीएआरसी’ यांच्यात पिकांवर विविध प्रकारचे संशोधन करण्यासाठी करार करण्यात आला. तांदळाच्या ३ वाणांवरील संशोधन हा त्याचा भाग आहे. ‘बीएआरसी’च्या ‘बायो सायन्स ग्रुप’चे सहयोगी संचालक व्ही. पी. वेणुगोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरू आहे. विद्यापीठातील प्रधान कृषी वैज्ञानिक
डॉ. दीपक शर्मा समन्वयक आहेत.