"भारताच्या कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही...", न्यायाधीशांच्या टिप्पणीवर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:01 PM2024-09-25T18:01:38+5:302024-09-25T18:04:26+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीशानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती वेदव्यासाचार्य श्रीशानंद यांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल जाहीर माफी मागितल्यानंतर त्यांच्याविरुद्धची कायदेशीर कार्यवाही बंद केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायाच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीशानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये न्यायाधीश श्रीशानंद यांनी बंगळुरूच्या मुस्लिमबहुल भागाला 'पाकिस्तान' म्हटले होते. तसेच, घरमालक-भाडेकरूच्या वादावरून एका महिला वकिलाबद्दल अपमानजनक टिप्पणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश श्रीशानंद यांच्या वादग्रस्त टिप्पणीची स्वतःहून दखल घेतली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रर जनरलकडून रिपोर्ट मागितला होता.
या प्रकरणाची सुनावणी आज झाली. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, भारताच्या कोणत्याही भागाला कोणीही पाकिस्तान म्हणू शकत नाही. हे मूलतः राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या विरुद्ध आहे. अशा टिप्पण्या वैयक्तिक पक्षपात दर्शवतात, विशेषत: जेव्हा ते एखाद्या विशिष्ट लिंग किंवा समुदायाकडे निर्देशित केले जातात असे मानले जाते. त्यामुळे कोणीही चुकीची टिप्पणी करणे टाळावे. आम्ही विशिष्ट लिंग किंवा समुदायावर निर्देशित केलेल्या टिप्पण्यांबद्दल आमची गंभीर चिंता व्यक्त करतो आणि अशा टिप्पण्यांचा नकारात्मक अर्थ लावला जाऊ शकतो.
कोण आहेत न्यायाधीश वेदव्यासचार श्रीशानंद?
न्यायाधीश वेदव्यासचार श्रीशानंद हे गेल्या तीन वर्षांपासून उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश आहेत. त्यांनी ५ मे २०२० रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला, त्यानंतर ते २५ सप्टेंबर २०२१ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश झाले.