कोरोनावरील उपचारांसाठी मुंग्यांची चटणी वापरण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, आधी जाऊन लस घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 05:10 PM2021-09-10T17:10:57+5:302021-09-10T18:52:24+5:30
जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court) दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे.
कोरोनावरील (corona) उपचारासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. जगभरात शास्त्रज्ञ कोरानावरील उपचारासाठी संशोधन करत आहेत. अशात एका पारंपारिक उपचारालाही कोरोनावार परवानगी द्यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme court) दाखल करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळाली आहे.
हा पारंपरिक उपचार म्हणजे लाल मुंग्यांची चटणी. आदिवासी समाजात हा पदार्थ बनवला जातो. दरम्यान संपूर्ण देशभरात कोरोनासाठी अशा पारंपारिक उपचाराला परवानगी नाही देऊ शकत, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने म्हटलं, कित्येक पारंपारिक उपचार आहेत. आपल्या घरातही अनेक पारंपारिक उपचार केले जातात. पण या उपचारांचा परिणाम स्वतःला भोगावा लागतो. संपूर्ण देशासाठी आम्ही अशा पारंपारिक उपचाराचा अवलंब करण्याती परवानगी नाही देऊ शकत.
ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला ओडिशा हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोरोनाच्या विषाणूवर (Covid -19 ) केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत होते. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर हायकोर्टाने याचिका फेटाळाली. ओडिशा हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. पण आता सुप्रीम कोर्टानेसुद्धा याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने कोरोना लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.
काय असतं या मुंग्यांच्या चटणीत?
पाढीयाल यांच्या मते, चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. त्यांनी पुढं सांगितलं की, 'ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच याचा बर्याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो.' पाढीयाल यांच्या मते, आदिवासी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.