महाराष्ट्र सदनातील कँटीन तडकाफडकी बंद; कारवाईला न्यायालयात आव्हान देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:07 AM2022-10-07T09:07:19+5:302022-10-07T09:07:51+5:30
महाराष्ट्र सदनात वास्तव्याला असणाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: महाराष्ट्र सदनातील कँटीन तडकाफडकी ५ ऑक्टोबरला बंद करण्यात आली. यामुळे महाराष्ट्र सदनात वास्तव्याला असणाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
जुन्या व नव्या महाराष्ट्र सदनातील कँटीनमध्ये या दोन्ही ठिकाणी राहणारे भोजन, नास्ता, चहा तर घेतातच, परंतु दिल्लीतील मराठी व गैरमराठी महाराष्ट्रातील पाककृतींचे चाहते दररोज आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र सदनात आवर्जून येतात. अचानकपणे ४ ऑक्टोबरला रात्री मुंबईतील मंत्रालयातून आदेश आल्यानंतर तडकाफडकी कँटीन बंद करण्यात आली. जेकेजी आऊटडोअर केटरिंग सर्विसेसला या कँटिनचे कंत्राट सप्टेंबर २०२१ मध्ये ५ वर्षांसाठी मिळाले होते.
कँटीनच्या कंत्राटदारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने ही कँटीन बंद केल्याचे सांगण्यात आले. जेकेजी आऊटडोअर केटरिंग सर्व्हिसेसच्या पद्मा रावत म्हणाल्या, आमच्या फर्मवर लावण्यात आलेले आरोप निराधार असून कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"