राजधानी, शताब्दीचा चेहरामोहरा बदलणार
By Admin | Published: June 27, 2017 12:30 AM2017-06-27T00:30:59+5:302017-06-27T00:30:59+5:30
मनोरंजनासह आरामदायी प्रवास व्हावा, म्हणून रेल्वे राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसचा आंतरबाह्य कायापालट करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मनोरंजनासह आरामदायी प्रवास व्हावा, म्हणून रेल्वे राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसचा आंतरबाह्य कायापालट करणार आहे. खाद्यपेय व्यवस्था अधिक तत्पर करण्यास थेट प्रवाशांपर्यंत आवडीचे पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी ट्रॉली सेवा, प्रवाशांच्या दिमतीला गणवेशधारी विनम्र कर्मचारी आणि बसल्या जागी भरपूर मनोरंजन आदी सोईसुविधांसह आकर्षक बदल केले जाणार आहेत.
राजधानी, शताब्दी या जलद आणि लोकप्रिय रेल्वेच्या प्रवाशांना सुखद प्रवास अनुभवता यावा, म्हणून भारतीय रेल्वेने १५ राजधानी आणि १५ शताब्दी अशा एकूण ३० ट्रेन्सचा आंतरबाह्य चेहरामोहरा बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी अंदाजे २५ कोटी खर्च लागणार आहे. या सेवांमुळे प्रवासी भाड्यातून रेल्वेला चांगली कमाई अपेक्षित आहे.
आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सणासुदीसाठी राजधानी आणि शताब्दीच्या डब्यांतील सोईसुविधा प्रवाशांच्या पसंतीला हमखास उतरतील, अशा पद्धतीने केल्या जात असून, अंतर्गत सजावटीसह स्वच्छतागृहांचा कायापालट केला जाणार आहे. डबे चकाचक असतील आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डब्यात सुरक्षा जवान तैनात केले जातील.