‘राजधानी’ हुकली? विमानाने जा!
By admin | Published: May 27, 2016 12:27 AM2016-05-27T00:27:46+5:302016-05-27T00:27:46+5:30
रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट शेवटपर्यंत प्रतिक्षा करूनही कन्फर्म झाले नाही म्हणून प्रवासाची आखलेली योजना पूूर्णपणे मोडित न काढता थोडे अधिक पैसे भरून त्याच ठिकाणी
नवी दिल्ली : रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट शेवटपर्यंत प्रतिक्षा करूनही कन्फर्म झाले नाही म्हणून प्रवासाची आखलेली योजना पूूर्णपणे मोडित न काढता थोडे अधिक पैसे भरून त्याच ठिकाणी एअर इंडियाच्या विमाने जाण्याचा पर्याय प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे.
एअर इंडिया आणि आयआरसीटीसी( रेल्वे) यांच्यात यापूर्वीच त्याबाबत करार झाला असून आठवडाभरात तशी व्यवस्था केली जाणार असल्याचे एअर इंडियाचे सीईओ आश्विनी लोहानी यांनी सांगितले. राजधानी एक्स्प्रेसच्या कोणत्याही श्रेणीचे तिकीट कन्फर्म नसेल तर प्रवाशांना एअर इंडियाचे फ्लाईट पकडता येईल. त्यासाठी प्रवाशांना थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. संबंधित रेल्वेमार्गावरील विमानतळांवर एअर इंडियाची सेवा असावी एवढीच अट राहील. लवकरच या योजनेचा तपशील जाहीर केला जाईल, असे लोहानी यांनी सांगितले.
एअर इंडियाच्या विमानाची तिकिटेही या योजनेनुसार आयआरसीटीसीकडूनच उपलब्ध करून दिली जातील. राजधानी एक्स्प्रेसचे एसी फर्स्ट क्लासचे प्रतिक्षा यादीवरील तिकिट असलेल्या प्रवाशांना एअर इंडियाने प्रवास करण्यासाठी कोणतीही जादा रक्कम भरावी लागणार नाही. मात्र सेकंड व थर्ड एसी वर्गाचे प्रतिक्षा यादीवरील तिकिट असणाऱ्यांना प्रति प्रवासी दोन हजार रुपयांपर्यंत जादा रक्कम भरावी लागेल, असे लोहाणी यांनी स्पष्ट केले.
एअर इंडियाच्या ‘महाराजा’ने रेल्वे प्रवाशांच्या मदतीला अशा प्रकारे धावून जाण्यात त्याचा स्वार्थही आहे. सततच्या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एअर इंडियाला प्रवाशांची गरज आहे. या द्विपक्षीय व्यवस्थेमुळे एअर इंडियाला एरवी विमानातील जी आसने रिकामी राहिली असती ती भरण्याची सोय उपलब्ध
होईल. (वृत्तसंस्था)