'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 08:54 AM2020-02-25T08:54:06+5:302020-02-25T08:55:11+5:30
दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे उत्तर-पूर्व भागातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतल्या मौजपूरमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(NRC)च्या विरोधात सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात सोमवारी हिंसाचार व गोळीबार झाला. गोकुळपुरी येथे दोन गटांतील हिंसाचारात एक पोलीस हेड कॉन्स्टेबल व 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन आम आदमी पक्षाचे नेते आणि मंत्री मनिष सिसोदिया यांनी आपल्या दिल्लीला वाचविण्याचं आवाहन केलंय.
दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे उत्तर-पूर्व भागातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शाळांमधील परीक्षाही रद्द करण्यात आल्याचे मनिष सिसोदिया यांनी सांगितलंय. तर, दहावीच्या बोर्ड परीक्षेतील उद्याचा पेपरही रद्द करण्यात आला आहे. मनिष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ते ट्विट रिट्विट केलंय. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांवर अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्याच शहरात एवढी भिती यापूर्वी कधीही वाटली नव्हती. मी आज खूप दु:खी आणि हतबल आहे. ही आपली दिल्ली आहे, देशाची राजधानी आहे, हिला वाचवायचंय, असेही सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
दिल्ली में हिंसा प्रभावित नोर्थईस्ट ज़िले में कल स्कूलों की गृह परीक्षाएँ नहीं होंगी और सभी सरकारी एवं प्राइवेट स्कूल बंद रहेंगे. बोर्ड परीक्षाओं के सम्बंध में मैंने HRD Minister @DrRPNishank जी से बात की है कि इस ज़िले में कल की बोर्ड परीक्षा भी स्थगित कर दी जाए.
— Manish Sisodia (@msisodia) February 24, 2020
तीन दशक से दिल्ली में हूँ. अपने ही शहर में इतना डर कभी नही लगा. क्या हो गया है ये? कौन लोग हैं जो दिल्ली में आग लगा रहे हैं? बेहद दुखी और शर्मिंदा हूँ आज. ये हमारी प्यारी दिल्ली है. देश की राजधानी है. इसे बचाना ही होगा.
— Manish Sisodia (@msisodia) February 24, 2020
दरम्यान, या हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठं विधान केलं आहे. देशाचे गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे. दिल्ली पोलिसांचा एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला आहे. काँग्रेस पक्ष आणि काही राजकीय दलांना मी विचारू इच्छितो याची जबाबदारी कोण घेणार?, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचं षडयंत्र केलं जात आहे, असे रेड्डी यांनी म्हटलेआहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी उत्तर पूर्व दिल्लीतील दहा ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. मौजपूर परिसरात सीएए समर्थक व विरोधक दोघांमध्ये दगडफेक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व लाठीमाराचाही वापर करावा लागला. दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.