फाशीची शिक्षा; याचिका आता घटनापीठाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 05:45 AM2022-09-20T05:45:18+5:302022-09-20T05:46:08+5:30
फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतच्या याचिकेची विस्तारित खंडपीठापुढे सुनावणी होणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : फाशीची सुनावलेली शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतची एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केली आहे. कोणत्या स्थितीत ही मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणावीत, याचाही विचार हे घटनापीठ करणार आहे. या विषयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती.
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतच्या याचिकेची विस्तारित खंडपीठापुढे सुनावणी होणे आवश्यक आहे. कोणत्या परिस्थितीत एखाद्या आरोपीची फाशीची शिक्षा कमी करावी याबाबत न्यायालयाने अतिशय सुस्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. कोणत्याही आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, असाही एक मतप्रवाह देशामध्ये आहे. काही देशांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी कोणते निकष लावले जावेत, यावरही काही खटल्यांमध्ये न्यायालयात युक्तिवादही झाले होते.