राजधानीचे रूपांतर गॅस चेंबरमधे : १७ वर्षांत प्रथमच इतके खराब हवामान

By admin | Published: November 7, 2016 07:03 AM2016-11-07T07:03:04+5:302016-11-07T07:03:04+5:30

राजधानी दिल्ली १७ वर्षांत प्रथमच अत्यंत खराब हवामानाचा सामना करते आहे. एखाद्या गॅस चेंबरसारखी साऱ्या शहराची अवस्था आहे

The capital is transformed into gas chamber: the worst weather for the first time in 17 years | राजधानीचे रूपांतर गॅस चेंबरमधे : १७ वर्षांत प्रथमच इतके खराब हवामान

राजधानीचे रूपांतर गॅस चेंबरमधे : १७ वर्षांत प्रथमच इतके खराब हवामान

Next

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
राजधानी दिल्ली १७ वर्षांत प्रथमच अत्यंत खराब हवामानाचा सामना करते आहे. एखाद्या गॅस चेंबरसारखी साऱ्या शहराची अवस्था आहे. दाट धुके आणि प्रदूषणाचे मिश्रण (स्मॉग)चे हवेतले प्रमाण सर्वसाधारण हवेच्या तुलनेत १५ पट अधिक म्हणजे धोकादायक पातळीवर आहे. घराबाहेर पडताना लोकांना मास्क लावून हिंडणे अनिवार्य झाले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्मॉगच्या समस्येवर तातडीचे उपाय करण्यासाठी रविवारी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन १0 कलमी योजना जाहीर केली.
दिल्लीत प्रदूषण व दाट धुक्याचे प्रमाण अचानक वाढण्याचे मुख्य कारण हरयाणा, पंजाब, राजस्थान इत्यादी निकटच्या राज्यातले शेतकरी खरीप पिकांची कापणी झाल्यावर रब्बी पिकांच्या तयारीसाठी जमिनीतले खरीप पिकांचे अवशेष (पराली) जाळतात. त्याचा धूर इतका व्यापक व धोकादायक असतो की तज्ज्ञांनुसार दिल्लीतल्या ताज्या स्थितीला तोच ७0 टक्के कारणीभूत आहे. दिल्लीत रस्त्यांवरील वाहनांचे प्रदूषण देशात सर्वाधिक आहे. याखेरीज वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व पाडकाम वाढले असून, त्यामुळे हवेत उठणारी धूळ, दिवाळीत फटाक्यांचा धूर वाढलेल्या प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
दिल्लीच्या राजपथावर तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी व रविवारी इतका घनदाट स्मॉग होता की अवघे २00 ते ३00 मीटर अंतरच स्पष्ट दृश्यता होती. रस्त्यावरून हिंडताना श्वसनाला त्रास होणे, डोळे चुरचुरणे यासारख्या विविध प्रकारांना दिल्लीकर सामोरे जात होते. स्मॉगमुळे शनिवारी दिल्लीतल्या १८00 शाळांना विद्यार्थ्यांना सुटी द्यावी लागली. धनदाट धुक्यामुळे अनेक रस्त्यांवर अपघातही ओढवले.
प्रदूषणासाठी जगभर बदनाम असलेली चीनची राजधानी बीजिंगलाही गेल्या ३ दिवसांत दिल्लीतल्या स्मॉगने मागे टाकले आहे. प्रमाणाबाहेर प्रदूषण वाढल्यामुळे अस्थमा, श्वसनरोग, रक्तदाब इत्यादी रुग्णांवर अत्यंत कठीण स्थिती ओढवली. दवाखान्यातली गर्दी ६0 टक्क्यांनी वाढली. खराब हवामानापासून स्वत:च्या बचावासाठी अनेक जण दिल्लीबाहेर थंड हवेच्या ठिकाणी मार्गस्थ झाले.
ही तर वातावरणाची अणीबाणीच आहे, असे केंद्र सरकारने संबोधले असून, त्यातून उचित मार्ग काढण्यासाठी पर्यावरण मंत्री अनिल दवेंनी सोमवारी दिल्ली, पंजाब, हरयाणा, राजस्थान व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली
आहे.


केजरीवालांच्या
उपाययोजना
१सोमवारपासून सलग तीन दिवस तसेच शनिवार आणि रविवारीदेखील दिल्लीतल्या तमाम शाळांना सुटी देण्यात आली आहे.
२पाच दिवस दिल्लीतील सारी बांधकामे व पाडकाम थांबविण्यात आले आहे.
३१0 दिवस रुग्णालये व मोबाइल टॉवर्स वगळता अन्यत्र डिझेल जनरेटर्स सेट वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.
४या सप्ताहात लोकांनी शक्यतो घरी बसूनच काम करावे, बाहेर पडू नये असे आवाहन.
५रस्त्यांवरील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा आॅड इव्हन फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता.
६बदरपूर औष्णिक विजनिर्मिती प्रकल्प पुढले १0 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
७दिल्लीत झाडपाला व कचरा जाळण्यास तसेच राख हलवण्यास बंदी घालण्यात आली असून, ज्या भागात राख सापडेल त्याला जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.
८ हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून तमाम मोठ्या रस्त्यांवर सोमवारपासून दररोज काही दिवस पाणी शिंपडले जाणार आहे.
९ १0 नोव्हेंबरपासून आठवड्यातून एकदा व्हॅक्युम क्लिनिंगचा प्रयोगही अवलंबण्यात येणार आहे.
१०कृत्रिम पावसाचा प्रयोग मुख्यमंत्र्यांच्या योजनेत आहे; मात्र त्यासाठी केंद्र सरकारची मदत व परवानगी लागेल.


एअर प्युरिफायरची विक्री
चौपट
दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआर धुके आणि प्रदूषणामुळे गुदमरल्यामुळे हवा शुद्ध करण्याच्या उपकरणांच्या (एअर प्युरिफायर) विक्रीला मोठी गती मिळाली आहे. युरेका फोर्ब्ज, ब्लूएअर, केंट आरओ आणि पॅनासोनिक यांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीत चारपट वाढीची अपेक्षा आहे. दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमधील हवेतील दूषित कणांची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे एअर प्युरिफायर उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वाढीची अपेक्षा उत्पादकांना आहे. शापूरजी पालोनजी ग्रुपच्या युरेका फोर्ब्जचा या उत्पादनातील बाजारपेठेतील वाटा ४० टक्के असून, विक्रीत मोठी वाढ झाल्याचे कंपनीने मान्य केले. परंतु विक्रीचा आकडा जाहीर करता येणार नसल्याचे कंपनीने म्हटले.


दिल्ली सरकारनं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. एअर क्वालिटी इंडेक्सच्या मते, दिल्लीतली वायू प्रदूषणाची गती तीव्रतेने वाढते आहे. दिवाळीनंतर वायुप्रदूषणाचा निर्देशांक मूल्य ४४५हून ४८५ एवढा वाढला आहे. दिल्लीच्या प्रदूषणात जवळपास ४० टक्के वाढ नोंदवली गेली आहे.


7000 जवानांना देणार मास्क
दिल्ली आणि परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना मास्क देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ७ हजार मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: The capital is transformed into gas chamber: the worst weather for the first time in 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.