Amarinder Singh-Ajit Doval Meeting: कॅप्टन अमरिंदर सिंगांनी शाहांनंतर घेतली डोवालांची भेट; सिद्धू गोत्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:58 PM2021-09-30T12:58:38+5:302021-09-30T12:59:47+5:30
Amarinder Singh-Ajit Doval Meeting: पंजाबमध्ये काँग्रेस कात्रीत सापडली आहे. एकीकडे सिद्धू यांनी राजीनामा देत पक्षवर दबाव टाकला आहे, दुसरीकडे कॅप्टननी आता कॉम्प्रोमाईज नाही अशी भूमिका घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने काँग्रेसला नेमके काय करावे हेच कळेनासे झाले आहे.
पंजाबमध्ये सुरु असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पायउतार झालेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) हे दिल्लीत आहेत. बुधवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. याचबरोबर त्यांनी आणखी एका मोठ्या व्यक्तीची भेट घेतली. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Amarinder Singh-Ajit Doval Meeting after Bjp's Amit shah.)
अमरिंदर सिंगांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवज्योतसिंह सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. खरेतर कॅप्टन हे मंगळवारीच अमित शहांच्या भेटीला जाणार होते. परंतू तेवढ्यातच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने एक दिवस उशिरा शाहांची भेट घेण्याचा निर्णय कॅप्टननी घेतला. पंजाबमध्ये सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले होते. विरोधी आमदारांना गोळा करून त्यांनी कॅप्टनना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लावले होते. तेव्हा कॅप्टननी सिद्धू यांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध असून ते आपल्याला महागात पडतील असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला होता.
परंतू, सोनिया यांनी कॅप्टनना सॉरी अमरिंदर असे म्हणत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यामुळे नाराज असलेले अमरिंदर यांनी काहीही झाले तरी सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. यानंतर नाराज असलेल्या अमरिंदर यांनी भाजपात जाण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अमरिंदरना पक्ष हवा होता, तर भाजपाला पंजाबमध्ये सत्ता आणणारा नेता. यामुळे अमित शाह यांनी कॅप्टनना भेट दिली.
Met Union Home Minister @AmitShah ji in Delhi. Discussed the prolonged farmers agitation against #FarmLaws & urged him to resolve the crisis urgently with repeal of the laws & guarantee MSP, besides supporting Punjab in crop diversification. #NoFarmersNoFood
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 29, 2021
सिद्धू यांच्या पाकिस्तान कनेक्शनवर अमरिंदर यांनी डोवाल यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. तसेच अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत कृषी कायद्यांवर चर्चा झाल्याचे अमरिंदर यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा आणि एमएसपीची गॅरंटी द्यावी अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगितले.
पंजाबमध्ये काँग्रेस कात्रीत सापडली आहे. एकीकडे सिद्धू यांनी राजीनामा देत पक्षवर दबाव टाकला आहे, दुसरीकडे कॅप्टननी आता कॉम्प्रोमाईज नाही अशी भूमिका घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने काँग्रेसला नेमके काय करावे हेच कळेनासे झाले आहे. या साऱ्या वर्चस्वाच्या लढाईत पंजाबसारखे राज्य काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.