मोठी बातमी! कॅप्टन अमरिंदर सिंग हाती घेणार 'कमळ'; लवकरच पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:46 PM2022-07-01T18:46:11+5:302022-07-01T18:50:58+5:30
गेल्यावर्षी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःचा पक्ष सुरू केला होता. पण, आता त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण होणार आहे.
चंदीगड: गेल्या वर्षी काँग्रेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या आठवड्यात ते त्यांचा ‘पंजाब लोक काँग्रेस’ पक्ष भाजपमध्ये विलीन करू शकतात. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 89 वर्षीय अमरिंदर सिंग सध्या पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये गेले आहेत. पुढील आठवड्यात ते भारतात परतण्याची शक्यता आहे.
शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमरिंदर सिंग यांच्याशी संवाद साधला. ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर काँग्रेस पक्ष सोडला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पाच दशकांपासून काँग्रेसशी संबंधित होते. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, नेतृत्वाकडून तीन वेळा त्यांचा अपमान झाला. अमरिंदर यांनी त्यावेळी इशारा दिला होता की, अजूनही त्यांचे राजकारण अजून संपलेले नाही.
कॅप्टन अमरिंदर सिंग तीनवेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारली होती. निवडणुकीदरम्यान, त्यांनी स्वतःचा पक्षही काढला आणि भाजपसोबत पंजाबची निवडणूक लढवली. त्यात कॅप्टन यांचा पटियालामध्ये दारुण पराभव झाला.