अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण
By मनोज गडनीस | Updated: January 7, 2025 05:57 IST2025-01-07T05:55:17+5:302025-01-07T05:57:40+5:30
कंदाहार अपहरणातील आयसी-८१४ चे कॅप्टन देवी शरण निवृत्त

अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंदाहार अपहरणानंतर वैमानिक म्हणून माझ्या मनात भीती बसू नये म्हणून भीती व तत्सम भावना मनातून झटकून टाकल्या आणि त्या घटनेच्या चौथ्याच दिवशी मी मुंबई ते कोझीकोडे (तत्कालीन कालिकत) आणि कोझीकडे ते शारजा असे विमानाचे उड्डाण केले. आज ४० वर्षे वैमानिक म्हणून काम केल्यावर माझ्या मनात केवळ उत्तम सेवा देऊ शकलो ही कृतज्ञता आहे, अशी भावना आयसी-८१४ विमानाचे उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी शरण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
भारतीय हवाई उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक भयावह घटना म्हणून नोंद झालेली कंदाहार अपहरणाची घटना २४ डिसेंबर १९९९ या दिवशी घडली होती. एअर इंडियाच्या आयसी-८१४ या विमानाने नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत विमानात प्रवासी म्हणून बसलेल्या पाच अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेत विमानाचे अपहरण केले.
त्यावेळी विमानामध्ये १७९ प्रवासी आणि ११ केबिन कर्मचारी होते. अपहरण केलेले हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे फिरविण्यात आले. यादरम्यान अतिरेक्यांनी काही प्रवाशांची हत्यादेखील केली. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले.
अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या अपहृत प्रवाशांना सोडण्यात आले. अपहरणाच्या या काळात कॅप्टन देवी शरण यांनी अत्यंत संयत भूमिका पाळली आणि अतिरेक्यांशी संवाद साधतानाच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड प्रयत्न केले. वैमानिक म्हणून ४० वर्षे कामगिरी केलेले कॅप्टन देवी प्रसाद शनिवारी निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरातून दिल्लीसाठी त्यांनी अखेरचे विमान उडवले. आपल्या कारकिर्दीमध्ये २५ हजार तास विमान उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी प्रसाद यांना एअर इंडिया कंपनीने अत्यंत सन्मानाने निरोप दिला.