सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात, जाणून घ्या कोण आहेत कॅप्टन शिवा चौहान?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:27 PM2023-03-06T19:27:46+5:302023-03-06T19:29:16+5:30
शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
नवी दिल्ली : भारतीय लष्करात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. यात आता कॅप्टन शिवा चौहान यांचे नाव जोडले गेले आहे. शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये कॅप्टन शिवा चौहान यांना कठोर प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये बर्फाची भिंत चढणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन बचाव कवायतींचा समावेश होता. दरम्यान, कॅप्टन शिवा चौहान एका कठीण चढाईनंतर यावर्षी 2 जानेवारीला सियाचीन ग्लेशियरमध्ये सामील झाल्या होत्या.
भारतीय लष्कराने माहिती दिली की, कॅप्टन शिवा चौहान यांच्या नेतृत्वाखालील सैपर्सच्या टीमला अनेक अभियांत्रिकी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पोस्टवर तैनात केले जाईल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 जानेवारी रोजी शिवा चौहान यांच्या पोस्टिंगचे कौतुक केले होते. त्यांनी ट्विट केले होते की, "भारताच्या महिला शक्तीची भावना दर्शविताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल." लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, विविध आव्हानांना न जुमानता कॅप्टन शिवा चौहान यांनी पूर्ण बांधिलकीने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आणि त्या सियाचीन ग्लेशियरमध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत.
कॅप्टन शिवा चौहान या राजस्थानच्या रहिवासी आहेत. त्या बंगाल सॅपर अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण उदयपूरमधून झाले. त्यांनी उदयपूरच्या एनजेआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. लष्कराने म्हटले होते की, "लहानपणापासूनच शिवा चौहान यांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांनी अतुलनीय उत्साह दाखवला आणि मे 2021 मध्ये त्यांना अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले."
#WATCH | Captain Shiva Chauhan of the Indian Army is the first female officer to have been deployed on the world’s highest battlefield Siachen glacier.
— ANI (@ANI) March 6, 2023
(Video: Indian Army) pic.twitter.com/WWEdq4O0RY
सियाचीन बॅटल स्कूलमधून घेतले प्रशिक्षण
कॅप्टन शिवा चौहान यांनी जुलै 2022 मध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सियाचीन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारकापर्यंतच्या सुरा सोई सायकल मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले. सियाचीनमध्ये रेजिमेंट आणि नेत्रदीपक कामगिरी यावर आधारित त्यांची सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी निवड झाली होती.