वाहन अपघातग्रस्तांना मिळू शकतील कॅशलेस उपचार; स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:56 PM2024-08-26T12:56:08+5:302024-08-26T12:57:21+5:30
या योजनेनुसार अज्ञात वाहनाच्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि जखमींसाठी ५०,००० रुपये देय आहे.
डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार मिळण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यावर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. याचवेळी पात्र व्यक्तींच्या खात्यात भरपाईच्या रकमेचे ऑनलाइन हस्तांतरण करण्यावरही निर्णय होईल.
केंद्राने एप्रिल २०२२ पासून हिट अँड रन मोटर अपघात भरपाई योजना, २०२२ लागू केली आहे. या योजनेनुसार अज्ञात वाहनाच्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि जखमींसाठी ५०,००० रुपये देय आहे. मात्र, या योजनेचा लाभ फारच कमी लोकांनी घेतला. याची दखल घेत, १२ जानेवारी २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाने अनेक निर्देश जारी केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने काय दिलेत निर्देश?
- हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी पीडितांना योजनेची माहिती दिली पाहिजे.
- हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींसाठी भरपाईच्या रकमेचा आढावा घ्यावा.
- योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.
- योजनेची जनजागृती वाढविण्यासाठी पावले उचलावीत
हिट अँड रन मोटर अपघात योजना, २०२२ च्या बळींना भरपाई देण्याबाबत निर्देश जारी करावे लागतील. जेणेकरून इन्शुरन्स कॉर्पोरेशन नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या खात्यावर भरपाईचे ऑनलाइन हस्तांतरण करू शकेल. रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना कॅशलेस उपचारांबाबतही विचार होईल.
- न्यायाधीश अभय एस. ओक आणि न्या. ए. जी. मसिह
हजाराे अपघात, दाव्यांची संख्या फक्त २००
- २०२२ मध्ये हिट अँड रन अपघात - ६७,३८७
- २०२२-२३ या आर्थिक वर्षात हिट अँड रन योजनेंतर्गत दावे- फक्त २०५,
- निकाली काढलेले दावे ९५
- पाच वर्षांत हिट अँड रन : मृत्यू ६६०, जखमी ११३,
- नुकसानभरपाई वितरित : एक कोटी ६० लाख