तीन गोळ्या लागूनही ड्रायव्हरनं ४० किमी कार चालवली; मालकाला रुग्णालयात नेलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:50 PM2022-05-17T14:50:40+5:302022-05-17T14:55:01+5:30
कंत्राटदार जय प्रकाश त्याचा चालक राधेशामसोबत एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात होता. त्याचवेळी गुंडांनी जय प्रकाश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले.
मोतिहारी - बिहारच्या मोतिहारी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हिंसक घटना घडत आहेत. चकिया परिसरात काही गुंडांनी कंत्राटदार आणि त्याच्या चालकावर गोळीबार केला. दोघांनाही गोळ्या लागल्या. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.
कंत्राटदार जय प्रकाश त्याचा चालक राधेशामसोबत एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात होता. त्याचवेळी गुंडांनी जय प्रकाश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. राधेशाम यांनादेखील गोळ्या लागल्या. मात्र जखमी अवस्थेत त्यांनी मालकासाठी जीवाची बाजी लावली. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या काहींच्या मदतीनं राधेशाम यांनी जय प्रकाश यांना कारमध्ये बसवलं आणि गुंडांचा पाठलाग सुरू केला.
रस्त्यातही गुंडांनी जय प्रकाश यांच्या कारवर गोळीबार केला. मात्र तरीही राधेशाम यांनी पाठलाग सुरूच ठेवला. तीन गोळ्या लागलेल्या असतानाही राधेशाम यांनी ४० किलोमीटर अंतर कापलं आणि जय प्रकाश यांना रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गंभीर जखमी असलेल्या राधेशाम यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
जय प्रकाश यांनी कंत्राटदार कमी कालावधीत स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांनी बराच पैसा कमावला. जय प्रकाश सरोत्तर गावचे रहिवासी होते. त्यांचे स्थानिक नेत्यांशी चांगले संबंध होते. कंत्राटावरून झालेल्या वादातून जय प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.