कार चालकाने रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही, पोलिसांनी ठोठावला 10 हजारांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:43 PM2024-03-19T13:43:49+5:302024-03-19T13:44:48+5:30
रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.
रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरही रुग्णवाहिकेला रस्ता देणे गरजेचे असते. असे न केल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. मात्र, यानंतरही काही लोक अनेकदा रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता देताना दिसून येत नाहीत. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका कार चालकाने रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही. यानंतर पोलिसांनी कार चालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील बरठीं मुख्य चौकातून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने पोलिसांनी कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून चौकात ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कार चालकाला कार हटवण्यास सांगितले, मात्र त्याने ती हटवली नाही. यानंतर कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकीकडे कार चालक रुग्णवाहिकेला रस्ता देत नव्हता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, समजावूनही ते मान्य झाले नाहीत. यादरम्यान, रुग्ण जवळपास 15 मिनिटे रुग्णवाहिकेत वेदनेने ओरडत राहिला. मात्र, त्यानंतरही कार चालकाने काहीही ऐकून घेतले नाही. तलाई पोलीस ठाण्याच्या प्रभारी अमिता यांनी सांगितले की, रस्त्यावर कार पार्क करणे आणि रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने कार चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे.
रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद!
दरम्यान, 2019 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले होते, ज्या अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. मोटार वाहन कायद्याच्या कलम 196 ई अंतर्गत, रुग्णवाहिकेचा मार्ग रोखणाऱ्या कोणत्याही वाहनावर 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती, जी पूर्वी 100 रुपये होती.