खटारा बस हद्दपार होणार, बॉडी कोडनुसारच तयार होतील गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:05 AM2018-05-14T02:05:54+5:302018-05-14T02:05:54+5:30
देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : देशभरात दररोज बसने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जुनाट बस वाहतूकीतून बाद करण्याकरिता केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
नव्या मानकानूसार बनविलेल्या बस यापुढे प्रवासी वाहतूकीसाठी मंजूरी देण्यात येईल असा नियम सरकारने बनविला असून त्याची अधिसूचनाही काढण्यात आली आहे. हा नियम पुढील वर्षीच्या एक एप्रिलपासून लागू होईल. भूपृष्ठ वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचलले.
काय आहे नवीन मानके?
बसमध्ये वापरण्यात येणाºया प्रत्येक सुट्या भागाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
बसचे दरवाजे, खिडक्या यांचा आकार, बसच्या बाहेरील व आतील दिवे कशा प्रकारचे व कुठे लावलेले असावेत, आरसे, हँडल, फिटिंग याबाबतही सूचना केल्या आहेत.
अग्निप्रतिबंधक साधने कोणती व कुठे बसवावीत, प्रवाशांकरिता असलेली उद्घोषणा व्यवस्था, आपत्कालीन मार्ग कसा असावा याबद्दलही विश्लेषण करण्यात आले.
प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसच्या सांगाड्याची बारकाईने तपासणी केली जाईल. भरधाव वेगात असलेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यानंतर प्रवाशांना किती धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टीचेही परीक्षण करण्यात येणार आहे. बसची एखादे वाहन किंवा अन्य गोष्टीशी टक्कर झाल्यास प्रवाशांचे कमीतकमी नुकसान व्हावे यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.सुखद प्रवास करता यावा म्हणून आसनांचा आकार, दोन आसनांमधील अंतर तसेच ही आसने बनविण्यासाठी कोणती सामग्री वापरावी याबाबतच्या सूचनाही आहेत.