गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे तर हायड्रोजनवर चालणार! सरकार आखतेय नवी योजना; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 09:49 AM2024-07-18T09:49:59+5:302024-07-18T09:50:20+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे.
नवी दिल्ली : प्रदूषणविरहित व स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाणाऱ्या हायड्रोजन वायूचा वाहनांमध्ये जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक योजना तयार करत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार आहे.
सध्या देशात मोजकीच हायड्रोजन वितरण केंद्रे कार्यरत आहेत. अशा प्रकारची आणखी केंद्रे उघडण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेतले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये भूपृष्ठ वाहतूक खाते, नवीन व अक्षय ऊर्जा खात्यातील वरिष्ठ अधिकारी, केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार आदींचा समावेश आहे. या समितीची बैठक ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. हायड्रोजनच्या देशांतर्गत साठ्यामध्ये वाढ करणे, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणे आदी गोष्टींसाठी ही समिती शिफारसी करणार आहे. त्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
स्वच्छ इंधन असलेल्या हायड्रोजनचा वाहनांमध्ये वापर वाढावा, यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्वच्छ, पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याच्या सूत्रांनी सांगितले. हायड्रोजन इंधन म्हणून वितरित करण्यासाठी देशात खूपच मोजकी केंद्रे आहेत. देशभरात अशा प्रकारची केंद्रे स्थापन करण्यासाठी व ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती करणार आहे.
हायड्रोजन साठ्यासाठी निर्माण करणार सुविधा
हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या कामात केंद्रातील सात ते आठ खात्यांचा सहभाग असणार आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला हे प्रत्येक खाते शिफारसी करणार आहे. ३५० ते ७०० बारपर्यंतच्या हायड्रोजन साठ्यासाठी योग्य सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल.
हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. मात्र हा वायू वितरित करण्याची यंत्रणा देशभरात उभारण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.