दीपक मिस्रांच्या कारकीर्दीत सुप्रीम कोर्टाचा कारभार योग्य दिशेने होत नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:50 AM2018-12-03T03:50:54+5:302018-12-03T03:51:33+5:30
तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचा कारभार योग्य दिशेने हाकला जात नव्हता, अशी टीका निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केली आहे.
नवी दिल्ली : तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाचा कारभार योग्य दिशेने हाकला जात नव्हता, अशी टीका निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केली आहे. अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे खटले सर्वोच्च न्यायालयातील तुलनेने कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविणे, चुकीच्या पद्धतीने खटल्यांच्या कामकाजाचे वाटप करणे, असे अनेक गंभीर आरोप दीपक मिस्रांवर न्या. कुरियन जोसेफ, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर, न्या. जे. चेलामेश्वर यांनी १२ जानेवारी रोजी एका पत्रकार परिषदेत केले होते.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणे ही त्या न्यायालयाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना होती. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा न राखल्यास लोकशाहीचे अस्तित्वही धोक्यात येईल, असा इशाराही या न्यायाधीशांनी दिला होता. कुरियन जोसेफ हे न्यायाधीश पदावरून ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज योग्य दिशेने चालावे याकरिता अनेक गोष्टी आम्ही चार न्यायाधीशांनी वारंवार दीपक मिस्रा यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या; मात्र इतके करूनही सरन्यायाधीश कोणतीच पावले उचलत नसल्याने अखेर ही गोष्ट देशासमोर आणण्यासाठी आम्ही पत्रपरिषद घेतली.
>पत्रकार परिषद घेतल्याबद्दल खंत नाही
न्या. कुरियन जोसेफ म्हणाले की, संपूर्ण सुधारणा व्हायला अजून काही कालावधी जावा लागेल. पत्रकार परिषद घेण्याच्या कृतीबद्दल अजिबात खंत वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर न्याययंत्रणेत भ्रष्टाचार आहे हा आरोप मी कदापिही मान्य करणार नाही. कनिष्ठ न्यायालयांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर सरकारने उपाययोजना केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात गैरप्रकार घडल्याचे माझ्या तरी कधीही निदर्शनास आले नाही.