पाण्यावरून कर्नाटक पेटले
By admin | Published: September 10, 2016 04:01 AM2016-09-10T04:01:36+5:302016-09-10T04:01:36+5:30
कन्नडसमर्थक संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे राजधानी बंगळुरूसह राज्याच्या जवळपास सर्व भागातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झाले.
बंगळुरू : कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ कन्नडसमर्थक संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे राजधानी बंगळुरूसह राज्याच्या जवळपास सर्व भागातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झाले.
तामिळनाडूसाठी कावेरी नदीचे पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. कन्नडसमर्थक संघटनांनी या निषेधार्थ लाक्षणिक बंदची हाक दिली होती. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्गमन टर्मिनल व रेल्वेस्थानकात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संघटनांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बंदमुळे परिवहन महामंडळाची बससेवा बंदच होती. आॅटोरिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावरून गायब होत्या. बंगळुरूतील मेट्रो सेवाही बंद ठेवण्यात आली होती. यामुळे विविध ठिकाणांहून बंगळुरूला येणाऱ्या आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. (वृत्तसंस्था)
>...तर प्रतिकूल परिणाम होईल
कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निर्णयामुळे कर्नाटकात आक्रोश निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी केली. कोंडी फोडण्यासाठी पंतप्रधानांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले. अशांतता राहिल्यास राज्याची अर्थव्यवस्था आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल, असे सिद्धरामय्या यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
>रस्तारोको; पाण्यात उतरून निषेध
कर्नाटक केबल आॅपरेटर असोसिएशननेही बंदचे समर्थन केले. असोसिएशनने तामिळ टीव्ही वाहिन्यांचे प्रसारण न करण्याची घोषणा केली. चित्रपटगृहांतही तामिळ चित्रपट न दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंड्या, म्हैसूर, बेल्लारी, कोप्पाला, चिक्काबल्लापुरा, धारवाड आणि कोलार येथेही बंदचा परिणाम दिसून आला. कावेरी निदर्शनांचा केंद्रबिंदू असलेल्या मंड्या येथे निदर्शकांनी बंगळुरू - म्हैसूर महामार्गावर अनेक ठिकाणी ठिय्या मारला. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी डोक्यावर धोंडे घेऊन नदीच्या पाण्यात निषेध केला. बेल्लारीत तामिळनाडूच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली.