कर्नाटकी बंडखोरांचा आज होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:22 AM2019-07-17T05:22:33+5:302019-07-17T05:22:50+5:30
आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे.
नवी दिल्ली : आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे. एच. डी. कुमारस्वामी सरकारकडून गुरुवारी विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचे भवितव्य या निकालावर अवलंबून असेल. राजीनामे दिलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम मुंबईतच असून न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बंगळुरुला न जाण्याचा मनसुबा त्यांनी आधीच जाहीर केला आहे.
तिकडे बंगळुरुमध्ये, आणखी फाटाफूट होऊ नये यासाठी काँग्रेस व जद(एस)ने अजूनही शिल्लक राहिलेल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आहे. अगदी सुरवातीस राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांना एका आर्थिक घोटाळ््याच्या संदर्भात ‘एसआयटी’ने सोमवारी रात्री ताब्यात घेतल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. परंतु चौकशीनंतर मंगळवारी त्यांना सोडून देण्यात आले.