हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:08 PM2020-06-29T13:08:54+5:302020-06-29T13:19:48+5:30
१५ जूनच्या त्या रात्री भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची एक एक गाथा आता समोर येत आहे. या संघर्षात देशाच्या सीमेचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या आणि तत्पूर्वी चिनी सैनिकांवर काळ बनून तुटून पडलेल्या एका जवानाच्या महापराक्रमाची कहाणीही अशीच रोमांचक आहे.
नवी दिल्ली - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाला आता पंधरवडा उलटत आला आहे. सध्या लडाखमधील या ठिकाणी दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. गलवानमधील हिंसक झटापटीत भारताच्या २० शूर जवानांना वीरमरण आले होते. तरच चीनचे ४३ हून अधिक सैनिक मारले गेले होते. दरम्यान १५ जूनच्या त्या रात्री भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याची एक एक गाथा आता समोर येत आहे. या संघर्षात देशाच्या सीमेचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या आणि तत्पूर्वी चिनी सैनिकांवर काळ बनून तुटून पडलेल्या एका जवानाच्या महापराक्रमाची कहाणीही अशीच रोमांचक आहे.
त्या रात्री चिनी सैनिकांना पळता भुई थोडी करणाऱ्या भारत मातेच्या या सुपुत्राचे नाव आहे गुरतेज सिंग. अवघ्या २३ वर्षांच्या गुरतेगने त्या रात्री भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी प्राण पणाला लावले. यासंदर्भातील वृत्त इंडिया टीव्ही, तचेस अन्य प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्षाला तोंड फुटल्यावर थर्ड पंजाब घातल प्लाटूनला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. या प्लाटूनच्या जवानांकडे पारंपरिक कृपाण आणि लाठ्या आणि धारदार चाकू आदी हत्यारे होती.
जिथे ही चकमक घडली त्या ठिकाणी घातक प्लाटूनचे जवान पोहोचल्यावर चिन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात २३ वर्षीय गुरतेज यांना चीनच्या चार सैनिकांनी घेरले. मात्र किंचीतही न डगमगलेल्या गुरतेज यांनी बोले सो निहाल, सत श्री अकाल, चा नारा देत चिन्यांवर चढाई केली. बघता बघता गुरतेज यांनी दोन चिन्यांचे काम तमाम केले. तर उरलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, या झटापटीत ते कड्याजवळ पोहोचले तिथून गुरतेज यांनी या चिन्यांना दरीत ढकलले. तर गुरतेजही तोल जाऊन खाली पडले. मात्र एका मोठ्या दगडाला ते अडकले.
मात्र या झटापटीत गुरतेज यांची मान आणि डोक्याला दुखापत झाली. तरीही ते लढण्यासाठी सज्ज झाले. आता कृपाण हाती घेत ते चिन्यांवर तुटून पडले. तसेच एका चीनी सैनिकाकडून एक धारदार हत्यार हिसकावत त्यांच्यावरच त्याने वार करण्यास सुरुवात केली. या झटापटीत त्यांनी सात चिनी सैनिकांना गारद केले. तसेच धारातीर्थी पडण्यापूर्वी त्यांनी अजून एका चिनी सैनिकाला कृपाणीचा वार करत ठार मारले. अखेर गंभीर जखमी झालेल्या आणि झटापटीत १२ चिन्यांना यमसदनी धाडणाऱ्या गुरतेज यांनी रणभूमीवरच आपला देह ठेवला.
१९ जून रोजी पंजाब घातल प्लाटूनने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचवले. तिथे गुरतेज यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करात सेवा देण्याचे स्वप्न पाहणारे गुरतेज २०१८ मध्ये लष्करात भरती झाले होते. आज ते या जगात नसले तरी त्यांचा पराक्रम पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या