कार धावता-धावताच ६० टक्के वीज तयार करेल, पेट्रोल आयातीचा खर्च वाचणार : गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 07:05 AM2023-08-30T07:05:13+5:302023-08-30T07:05:27+5:30
एका खासगी वाहन कंपनीच्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन कारच्या लाँचच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
नवी दिल्ली : ग्रामीण भारताला शक्तिशाली आणि भारताला आत्मनिर्भर बनविण्याची सर्वांत मोठी क्षमता जैवइंधनात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. एका खासगी वाहन कंपनीच्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन कारच्या लाँचच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
१६ लाख कोटींच्या पेट्रोल-डिझेलची आयात करणाऱ्या भारतात सीएनजी, एलएनजी, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल आणि हायड्रोजन अशा पर्यायी इंधनांचा वापर करूनही पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता भासणारच आहे; पण ही कार चालता चालता ६० टक्के वीज तयार करते आणि ४० टक्के इथेनॉलचा वापर करते.
अशा वाहनांमुळे देशाचा इंधनावरील आयात खर्च वाचेल आणि इथेनॉलची अर्थव्यवस्था पेट्रोलची गरज कमी करेल, शेतकऱ्यांचा लाभ होईल. त्याचवेळी ग्राहकांचा फायदा होऊन वायू प्रदूषण घटेल. शंभर टक्के इथेनॉल दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि बसेसमध्ये वापरले जाईल, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.