माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 08:18 PM2017-09-09T20:18:46+5:302017-09-09T20:20:30+5:30
सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
नवी दिल्ली, दि. 9 - सीबीआयने शनिवारी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सीबीआयने नटराजन यांच्या चेन्नईमधील निवासस्थानी छापे मारले. नटराजन यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वनखात्याच्या जमिनीवर खाणकामाला परवानगी देऊन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात नटराजन यांनी पर्यावरण मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप सीबीआयने केला आहे.
झारखंडमधील इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीला खाणकामासाठी परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. जयंती नटराजन यांनी पर्यावरण मंत्री म्हणून पदभार संभाळल्यानंतर वनखात्याची 55.79 हेक्टर जमीन अन्य पर्यायी कामांसाठी वापरण्यास ईसीएलला परवानगी दिली. मात्र नटराजन यांच्याआधीच्या मंत्र्याने अशी परवानगी नाकारली होती असे सीबीआयच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
नटराजन यांना त्यानंतर काँग्रेसने पर्यावरण मंत्रीपदावरुन हटवले होते. जयंती नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहून त्यावेळी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेसने त्यावेळी नटराजन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. राहुल यांच्यावर आरोप करण्यासाठी नटराजन यांच्यावर भाजपाशी संबंधित औद्योगिक घराण्यांचा दबाव आहे असे काँग्रेसने त्यावेळी म्हटले होते.
ईसीएलचे माजी संचालक उमंग केजरीवाल यांचे नावही एफआयआरमध्ये नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. नटराजन यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. नटराजन यांनी जानेवारी 2015 मध्ये काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.