दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:59 IST2025-02-04T11:56:09+5:302025-02-04T11:59:28+5:30
Delhi Election: सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आतिशी आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण?
Delhi Election: नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ५ वाजता समाप्त झाला. बुधवारी, ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानासाठी तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशातच आज मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आतिशी आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आतिशी यांचा समर्थक सागर मेहता एका पोलिसाला थप्पड मारताना दिसत आहे. दरम्यान, आतिशी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वतः पोलिसांना बोलविले होते, तरीही त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आतिशी आणि त्यांच्या समर्थकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या व्हिडिओत एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ बनवत असल्याचे दिसून येते. तो मागून व्हिडिओ बनवताना दिसतो. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. आतिशी आपल्या समर्थकांसह येथे पोहोचल्या होत्या, तेव्हा आतिशी यांच्यासोबत असलेल्या दोन समर्थकांपैकी एक असलेल्या सागरने व्हिडिओ बनवणाऱ्या पोलिसावर हात उचलला. ज्यामुळे मोबाईल खाली पडला. तसेच, मित्रा, आमचाही व्हिडिओ घे, असे म्हणताना सागरसोबत असलेल्या एक व्यक्तीचा आवाज ऐकू येत आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "राकेश बिधुडीच्या कुटुंबातील सदस्य उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मी तक्रार करत पोलीस आणि निवडणूक आयोगाला बोलवले, पण त्यांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजीव कुमार जी: तुम्ही निवडणूक प्रक्रिया किती खराब कराल?"
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर होतील. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबतच भाजपही सत्ताधारी आपसमोर एक कठीण आव्हान उभे केले आहे. २५ वर्षांहून अधिक काळानंतर राष्ट्रीय राजधानीत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न केले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपने रोड शो आणि सभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.