चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास निवडणूक रद्द

By admin | Published: November 3, 2016 06:29 AM2016-11-03T06:29:28+5:302016-11-03T06:29:28+5:30

निवडणूक लढवताना एखाद्या उमेदवाराने शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते

In case of incorrect educational information, the election cancellation | चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास निवडणूक रद्द

चुकीची शैक्षणिक माहिती दिल्यास निवडणूक रद्द

Next


नवी दिल्ली : निवडणूक लढवताना एखाद्या उमेदवाराने शैक्षणिक माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची योग्य शैक्षणिक माहिती मिळणे हा सर्व मतदारांचा मुलभूत अधिकार असून, उमेदवाराने निवडणूक अर्जात चुकीची माहिती दिल्यास वा लपवल्यास त्याची निवड रद्द केली जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढवताना योग्य माहिती न दिल्यास निवड रद्दबातल ठरण्याची टांगती तलवार उमेदवारांवर असणार आहे.
मणिपूरमधील काँग्रेसचे आमदार मैरीमबेम पृथ्वीराज यांनी उमेदवारी अर्जामध्ये आपण एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतल्याची खोटी माहिती दिली होती. यासंबंधी करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने खडे बोल सुनावत मतदारांना उमेदवारांसंबधी पूर्ण आणि योग्य माहिती मिळत नसेल, तर त्यांच्या मतदानाच्या हक्काला काहीच अर्थ राहत नाही, असे नमूद केले. न्यायालयाने मैरीमबेम पृथ्वीराज यांची आमदारकीही रद्दबातल ठरवली.
उमेदवाराची माहिती सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असेल, तर त्याला मत द्यायचे की नाही याचा निर्णय मतदार घेऊ शकतो. त्याची शैक्षणिक पात्रता व संपत्ती पाहूनही उमेदवार निवडणूक लायक आहे का किंवा त्याला मत द्यावे का, हेही मतदार ठरवू शकतात, असे असे न्यायालय म्हणाले.
काँग्रेस आमदार मैरीमबेम पृथ्वीराज यांनी ही कारकुनी स्वरूपाची त्रुटी असल्याचा दावा केला होता. न्यायालयाने तो अमान्य केला. चुकीची माहिती सादर केल्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असल्याचे सांगून न्यायालयाने त्याची आमदारकी रद्द केली आहे. या काँग्रेस आमदाराने २००८ सालच्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे चुकीची माहिती दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले
होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: In case of incorrect educational information, the election cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.