कुलभूषण जाधव प्रकरणी भारत अडून, पाकिस्तानसोबत सर्व चर्चा रद्द
By admin | Published: April 15, 2017 08:28 AM2017-04-15T08:28:06+5:302017-04-15T08:30:31+5:30
कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील संबंध ताणले जात असून भारताने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व द्विपक्षीय चर्चांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 17 एप्रिल रोजी समुद्र सुरक्षेसंबंधी होणारी चर्चा रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून शुक्रवारी घेण्यात आला. भारताने अधिकृतरित्या पाकिस्तानला रविवारी होणा-या प्रस्तावित चर्चेसाठी आम्ही तुमच्या पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीच्या (पीएमएसए) प्रतिनिधीमंडळाच्या स्वागतासाठी तयार नसल्याचं कळवलं आहे. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांना झुगारत पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानसोबत चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचं म्हणजे गतवर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा थांबल्या होत्या. त्या नव्याने सुरु करण्याचे प्रयत्न नुकते सुरु झाले होते. गेल्याच महिन्यात सिंधू नदी करारावर चर्चा करण्यासाठी भारताचं प्रतीनिधीमंडळ पाकिस्तानला गेलं होतं. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांमधील सर्व प्रकारची देवाण - घेवाण थांबली आहे. "इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाने 17 एप्रिलला पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सी आणि भारतीय तटरक्षक दलात होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे, असं कळवलं असल्याची", माहिती पाकिस्तान उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते ख्वाजा तारिक यांनी दिली आहे.
याआधी भारत आणि पाकिस्तानदरम्यान सिंधू पाणी करारसंबंधी होणारी चर्चा स्थगित करण्यात आली होती. अमेरिकेत 11 ते 13 एप्रिलदरम्यान ही चर्चा होणार होती.
भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये 2005 रोजी एक करार झाला होता. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांना बेकायदेशीर जहाजं, सागरी प्रदूषण आणि नैसर्गित आपत्तीशी संबंधित गोष्टींची माहिती पुरवतील. 2016 मध्ये हा करार पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला. याआधी जुलै महिन्यात भारतीय तटरक्षक दल आणि पाकिस्तान समुद्र सुरक्षा एनज्सीमध्ये शेवटची चर्चा झाली होती.
हेरगिरीच्या आरोपांवरून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी जनरल्सनी गुरुवारी घेतला. जाधव यांना फाशी दिले गेले तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने आधीच दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमांडर्सची बैठक रावळपिंडीत झाली. त्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय झाला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
कुलभूषण जाधव प्रकरणाची थोडक्यात माहिती जनरल्सना देण्यात आली व अशा देशविरोधी कृत्यांबद्दल कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.