रवींद्र गायकवाड प्रकरणी संसदेतही राडा, सभागृह तहकूब
By admin | Published: April 6, 2017 12:26 PM2017-04-06T12:26:12+5:302017-04-06T12:37:43+5:30
एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी या वादासंबंधी आज लोकसभेत निवदेन दिले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - विमानात राडा करणाऱ्या शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भात आज संसदेतही गदारोळ झाला आहे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी या वादासंबंधी आज लोकसभेत निवदेन दिले. रविंद्र गायकवाडांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. मी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर पहिला हात उचलला नाही. एअर इंडियाच्या कर्मचा-याने माझी कॉलर पकडून मला ढकलले त्यावेळी मी प्रतिकार केला असा आपला बचाव करताना गायकवाड म्हणाले.
तू खासदार असशील पण पंतप्रधान नाही असे मला त्या कर्मचा-याने ऐकवले असे गायकवाड म्हणाले. हवाई प्रवास माझा संविधानिक अधिकार आहे. हवाई कंपन्या माझा अधिकार कसा नाकारु शकतात ? असा सवाल गायकवाडांनी विचारला. माझा गुन्हा काय चौकशीशिवाय माझी मीडिया ट्रायल सुरु आहे असे गायकवाड म्हणाले.
मी वारंवार तिकीटं बुक करुन रद्द केली अशा बातम्या येत आहेत. मी कधी तिकीट बुक करायला गेलो. हवाई प्रवासासाठी आधारकार्ड बंधनकारक केले तर कोण तिकीट बुक करतो ते समजेल असे गायकवाड म्हणाले.
शिवसेनेच्या अन्य खासदारांनीही लोकसभेमध्ये गायकवाड यांची पाठराखण केली आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याचे अध्यक्षांना सांगितले. एअर इंडिया सुरक्षेला प्राधान्य देत असल्याची बाजू नागरी उड्डाण मंत्री गजापती यांनी मांडली. मात्र यावेळी प्रचंड गदारोळ झाला आणि विमान प्रवास बंदी कुठल्या कायद्यात बसते ते सांगण्याची मागणी खासदारांनी केली. यावेळी प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज थांबवण्यात आले.
दरम्यान, पोलीसांनी गायकवाड यांच्यावर खुनाचा प्रयत्न असे गंभीर कलम लावले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. इतके कठोर कलम कसे काय लावले गेले असा सवालही यावेळी सभागृहात उपस्थित करण्यात आला.