महात्मा गांधींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या, हिंदू महासभेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:37 AM2019-01-31T11:37:45+5:302019-01-31T11:45:27+5:30
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलनं गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यासहीत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलनं गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यासहीत 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलीस आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.
बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी विकृतीचा कळस गाठत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले. यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई करण्यास सुरुवात केली. हिंदू महासभेच्या महिला नेता पूजा पांडेयसहीत 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
India: Hindu fascists (Hindu Mahasabha) celebrate the assassination of Gandhi by shooting his effigy and honoring his Hindu fascist killer yesterday. pic.twitter.com/9LDeNd41LP
— CJ Werleman (@cjwerleman) January 30, 2019
''महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.''असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेय हिने केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.